Tuesday, October 22, 2013

श्रुतिशिरपक्ष सिद्धान्त | The Fundamental Doctrine
कितीही थोर अथवा मोठ्या व्यक्तीने चुकीचा सिद्धान्त मांडला तर तो चुकीचाच राहणार.  त्याला कोणाचाच इलाज नाही.  म्हणून अशा चुकीच्या पक्षापक्षांचा गोंधळ होतो.  विविध मतप्रणाली मांडली जाते.  यासाठी शास्त्र आदेश देते की, जिज्ञासु साधक हा पूर्ण अज्ञानी आहे.  त्यामुळे त्याला काहीच कळत नाही.  यासाठी त्याने एकाच ठिकाणी निष्ठा ठेवली पाहिजे.

कदाचित सुरुवातीला त्याला शास्त्र समजणार नाही, गर्भितार्थ किंवा एकत्व उमजणार नाही.  श्रुतिसंमत कितीतरी मुद्दे कदाचित समजणार नाहीत, कारण साधकाच्या मनाची हे ज्ञान ग्रहण करण्याची अजूनही तयारी झालेली नसते.  तरी सुद्धा जीवनात कोणत्यातरी एका सिद्धान्ताचा आश्रय घ्यावा व तो सिद्धान्त म्हणजे   श्रुतिशिरपक्ष  होय.  म्हणजेच वेदान्तप्रतिपादित महावाक्यांचा जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या सिद्धान्ताचा त्याने आश्रय घ्यावा.

आचार्य हा सिद्धान्त एका श्लोकात मांडतात –
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटीभिः |
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ||

कोट्यवधी ग्रंथामधून प्रतिपादित केलेले तत्व मी फक्त अर्ध्या श्लोकात सांगतो.  जगात ब्रह्म हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त असणारे नानारूपात्मक अनेकत्वयुक्त सर्व विश्व मिथ्या आहे.  जीव ब्रह्मापासून वेगळा किंवा भिन्न नाही.  जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे.   


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

 
 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment