Sunday, October 27, 2013

श्रुतिवाक्याचा आश्रय का घ्यावा ? | Why to have faith in ‘Shruti’ ?




श्रुतिवाक्याचा आश्रय का घ्यावा ?  हे स्पष्ट करताना आचार्य एक सुंदर दृष्टान्त देतात –

तावत् गर्जन्ति शास्त्राणि जम्बुका विपिने यथा |
न गर्जति महाशक्तिः यावत् वेदान्तकेसरी ||

अरण्यात महाशक्तिशाली वनराज गर्जना करत नाही तोपर्यंत, मी मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी बाकी सर्व कोल्ह्यांची कोल्हेकुई चालते.  त्याचप्रमाणे महाशक्तिशाली वेदान्तकेसरीब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ” हा सिद्धान्त मांडण्यास पुढे येत नाही, तोपर्यंतच इतर न्याय, सांख्य, वैशेषिक इत्यादी यांची बाजू घेणारे विद्वान आपापले सिद्धान्त अहमहमिकेने मांडतात व वादविवाद घालतात.  ते इतरांच्या मतांचे खंडन करून स्वतःच्या पक्षाचे प्रतिपादन करतात.

परंतु सर्वात शेवटी वेदान्तशास्त्र सर्व सिद्धान्ताचे खंडन करून सर्वश्रेष्ठ ठरते.  त्यामुळे वेदान्तशास्त्र हेच खरे शास्त्र व त्याने प्रतिपादित केलेला सिद्धान्त हाच खरा सिद्धान्त आहे.  म्हणून साधकाने वेदान्तप्रतिपादित श्रुतिसिद्धान्ताचाच आश्रय घ्यावा व तेथेच आपली श्रद्धा व निष्ठा ठेवावी.  शास्त्र अध्ययनात अद्वैत सिद्धान्त हेच निरतिशय व अंतिम सत्य असल्याने या वेदप्रतिपादित अद्वैत सिद्धान्तावरच पूर्ण श्रद्धा व निष्ठा ठेवावी.

द्वैतवादी शत्रूपक्षांची गर्दी मोठी असल्याने त्याच्याकडे जास्त माणसे आकर्षित होत असली तरीही आपण त्या पक्षाकडे जावे असे मुळीच नाही, कारण ते आकर्षित झालेले सर्वजण अज्ञानी व अविवेकी असू शकतील.  उदा.  सूर्य सकाळी उगवतो व रोज संध्याकाळी मावळतो ही क्रिया वैश्विक सत्य मानली जाते.  वैज्ञानिक दृष्ट्या ते सत्य नाही.  तरी सुद्धा सर्व लोक ते सत्य आंधळेपणाने स्वीकारतात.  तेव्हा विवेकी साधकाने त्रिकालाबाधित एकत्वाचा, ज्ञानाचा आश्रय घ्यावा.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

1 comment:

  1. namaste
    तावत् गर्जन्ति शास्त्राणि जम्बुका विपिने यथा |
    न गर्जति महाशक्तिः यावत् वेदान्तकेसरी ||

    yah kisne likha hai?

    ReplyDelete