Tuesday, October 1, 2013

श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् | The Believer acquires Knowledge

 
वेदांतशास्त्र श्रवण करताना माझ्या अहंकाराला पोषक आहे, तेवढेच मी ग्रहण करतो, आणि अन्य सर्व ज्ञान अमान्य करतो. वर्षानुवर्षे श्रवण, मनन, चिंतन, जप, नामस्मरण, ध्यान, उपासना, पूजा, अर्चना, अनुष्ठान, कीर्तन, भजन वगैरेदि अशा विविध प्रकारच्या साधना करूनही शास्त्राची दृष्टि न समजल्यामुळेच साधकाला आंतरिक तृप्ति, शांति, समाधान व आनंद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भगवान ज्ञानाचे प्रमुख साधन सांगतात –
 
श्रद्धावाँल्लभते ज्ञानम्   (गीता अ. ४-३९)
 
श्रद्धावान असणाऱ्या जिज्ञासु साधकालाच सम्यक् व यथार्थ ज्ञानाची प्राप्ति होते. साधकाला स्वतःच्या मानसिक संघर्षामधून बाहेर यावयाचे असेल तर श्रद्धा हेच साधन आहे. श्रद्धा साधकाला अत्यंत निकृष्ठ अवस्थेपासून उत्कृष्ठ, परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाते. या मार्गामध्ये अनेक धोके आहेत. खाचखळगे आहेत. श्रुति म्हणते –
 
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया |
दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति || (कठ. उप. १-३-१४)
 
तलवारीच्या धारेवर चालण्याप्रमाणे हा मार्ग अत्यंत खडतर, दुर्गम आहे.  “ येरागबाळ्याचे काम नोहे |  तेथे पाहिजे जातीचे || ”  अन्यथा अनेक साधक या मार्गमधून च्युत होण्याचीच शक्यता अधिक असते. परंतु या सर्व प्रसंगांच्यामध्ये जर श्रद्धा दृढ राहिली, तर तीच श्रद्धा साधकाला त्या सर्व प्रसंगांच्यामधून सहीसलामत बाहेर काढते. प्रसंगांच्याकडे पाहण्याची दृष्टि देते. श्रद्धाच साधकाला प्रत्येक दिवशी साधनेमध्ये प्रवृत्त करून दुर्दम्य उत्साह, प्रेरणा, शक्ति, सामर्थ्य, धैर्य व आत्मविश्वास देते. श्रद्धेमुळे साधनेमध्ये सातत्य येऊन साधक या मार्गामध्ये स्थिर व दृढ होतो. 
 
 
"श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
 
 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment