Tuesday, October 15, 2013

ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ? | Who should search the Supreme?

 
विषयांची जिज्ञासा निर्माण करून त्यांची प्राप्ति करणे, हे मनुष्याचे परम कर्तव्य नाही.  उलट प्रत्येकाने आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करावी व आत्माच जाणावा.
 
ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ?  अशा साधकाने, अशा गुणविशिष्ट जिज्ञासूने आत्मेच्छा किंवा ब्रह्मजिज्ञासा करावी –
 
१. ‘अस्मिन् जन्मनि वा परजन्मनि’, या जन्मात किंवा मागील अनेक जन्मात सेवावृत्तीने, ईश्वरार्पण बुद्धीने, निष्काम कर्मयोग करून अंतःकरण शुद्ध केले आहे;
२. विषयांच्या सर्व मर्यादा समजावून घेऊन विषयांचे वैराग्य प्राप्त केले आहे;
३. ऐहिक व पारलौकिक भोगप्राप्तीची इच्छा पूर्णपणे गळून पडली आहे;
४. अशी ही विवेकयुक्त वैराग्याची अंतःकरणाची अवस्था प्राप्त झाली आहे;
 
परंतु “ मला काहीही नको ” ही भावना एखाद्या निराश, हताश झालेल्या मनुष्याच्या मनातही असू शकेल.  मानसिक धक्का, संकट किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू यामुळे त्याला वैफल्यातून “ मला काही नको ” असे वाटेल.  पण ते वैराग्य तात्कालिक असते.  त्यात विवेकाचा पूर्ण अभाव असतो.
 
व्यक्ति त्यावेळी भावनावश झालेली असते.  त्यामुळे ते खरे वैराग्य नव्हे.  अशा मनाने त्याला शास्त्राचे आकलन होणार नाही, कारण त्याची ती जिज्ञासु मनाची अवस्था नाही.  नैराश्याने ग्रासलेली व्यक्ति जिज्ञासु होऊ शकत नाही.
 
विवेकयुक्त वैराग्याने हळुहळू दीर्घ कालावधीनंतरच जिज्ञासूला कायमस्वरूपाची मनाची परिपक्वता येते.  त्यामुळे त्या जिज्ञासूला “ पुढे काय ” ही उत्सुकता सतत असते.  या जिज्ञासु साधकाने ऐहिक किंवा पारलौकिकाची इच्छा न करता केवळ आत्मेछाच करावी.
 
 "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
 
 
- हरी ॐ
 

No comments:

Post a Comment