Tuesday, June 3, 2025

करुणः | Empathetic

 




करुणा कृपा दुःखितेषु दया तद्वान् करुणः सर्वभूताभयप्रदः संन्यासी इत्यर्थः |  दुःखी, दीन-दुबळ्या लोकांच्यावर दया करणे म्हणजेच करुणा होय.  संत तुकाराम महाराज म्हणतात –  

जे का रंजले गांजले |  त्यासी म्हणे जो आपुले |  

तोचि साधु ओळखावा |  देव तेथेची जाणावा ||                       (अभंग-गाथा)

तापत्रयांनी होरपळलेले जे अत्यंत दुःखी, कष्टी, असाहाय्य, अगतिक जीव आहेत, सर्वच बाजूंनी संकटे आल्यामुळे जे धैर्यहीन, अत्यंत निराश झालेले आहेत, ज्यांना स्वतःच्या सामर्थ्याने या परिस्थितीमधून बाहेर पडता येत नाही, अशा जीवांच्यावर हा पुरुष कृपा, दया करतो.  त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो.

 

असे हे जीव दुःखामुळे अत्यंत दीन, व्याकूळ, आर्त झाल्यामुळे सतत परमेश्वराचा धावा करीत असतात.  त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्यामुळे ते नैराश्याच्या अंधःकारात पूर्णपणे बुडून जातात.  जीवनामध्ये कधीतरी, कोणीतरी आशेचा उषःकाल दाखवेल म्हणून प्रतीक्षा करतात.  त्यासाठीच ते कसेतरी जीवन जगत राहातात.

 

अशा या दीनदुबळ्या जनांच्यावर दयेचा, कृपेचा वर्षाव करण्यासाठी परमेश्वर स्वतःच ज्ञानी पुरुषाच्या रूपाने अवतीर्ण होऊन या भूतलावरील दीन लोकांच्यावर कृपाकटाक्ष टाकतो.  ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अपार करुणा असते.  त्याच्या हृदयामध्ये दयेचा पाझर फुटून तो त्यांना सुखी करण्यासाठी रात्रंदिवस झटतो.  त्यांच्या दुःखाने तो स्वतःच व्याकूळ होतो.  आपल्याशिवाय अन्य व्यक्ति दुःखी-कष्टी आहे, ही कल्पनाच तो सहन करू शकत नाही.  ही त्याची व्याकुळता वरवरची नसते.  तो अंतरिक तळमळीने सतत त्यांच्यासाठी काया-वाचा-मनाने प्रयत्न करतो.  म्हणूनच तो करुणेचा सागर बनतो.  सर्वांची दुःखे निवारण करण्याचा प्रयत्न करतो.  यालाच ‘करुणा’ असे म्हणतात.  तो साक्षात करुणामय मूर्ति होतो.

 

या विश्वामध्ये दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होणारे लोक भरपूर आहेत; परंतु दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे लोक अत्यंत दुर्लभ, विरळ आहेत.  तेच लोक जीवनभर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुगंध निर्माण करण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजतात.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ