Tuesday, July 1, 2025

दृश्य जगाचे मूळ कारण काय? | Root Cause Of Visible Universe

 




हे जग डोळ्यांना दिसत आहे.  दिसत असेल तर ते नक्कीच उत्पन्न झाले आहे आणि जग उत्पन्न झाले असेल तर त्या जगाला काहीतरी कारण हे असलेच पाहिजे.  करणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची सिद्धि होत नाही, असा न्याय आहे.  मग येथे दिसणारे हे विश्व कोठून व कसे उत्पन्न झाले ?  हा प्रश्न आहे.

 

म्हणून विश्वाच्या कारणाचा सर्वजण शोध घेत आहेत.  परंतु जसे रज्जु-सर्प दृष्टांतामध्ये आपल्याला साप दिसतो.  तो साप कोठून उत्पन्न झाला ?  असा विचार करू लागलो तर तो साप दोरीमधून उत्पन्न झाला, हे त्याचे उत्तर आहे.  पण असे उत्तर मिळाले तरी सापाची प्रत्यक्ष निर्मिती झालेलीच नाही, ही वस्तुस्थिति आहे.  तरीही जोपर्यंत आपणास तो साप दिसत आहे, तो खरा वाटत आहे, तोपर्यंत आपणास दुसरा पुरुष समजावून देतो की, “अरे !  तुला जरी तो साप दिसत आहे, तो दोरीमधून उत्पन्न झाल्यासारखा वाटत आहे”, तोपर्यंतच दोरी हे त्या सापाचे कारण आहे.

 

परंतु ज्यावेळी आपणास समजेल की, अरे !  हा खरा साप नसून केवळ भास आहे, दोरीच केवळ सत्य आहे.  साप वस्तुतः उत्पन्नच झालेला नाही.  त्यामुळे सापाच्या निर्मितीचे खरे कारण दोरी असूच शकत नाही.  म्हणून दोरी व साप यांच्यामध्ये कारण-कार्यभाव शक्य नाही.  कारण येथील भ्रमात्मक सापाच्या निर्मितीमध्ये अन्य सहकारी कारणांचाही अभाव आहे.  त्यामुळे सिद्ध होते की, सापाची निर्मिती ही खरी नसून कल्पित आहे.

 

व्यवहारामध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष निर्मिती पाहतो तेव्हा तेथे मुख्य करणाबरोबरच अन्य सहकारी कारणे सुद्धा असतात.  जसे मातीपासून घट निर्माण होताना माती या कारणाबरोबरच पाणी, चाक वगैरेदि सहकारी करणे आहेत.  ही सर्व कारणे एकत्र येऊन घटाची प्रत्यक्ष निर्मिती होते.  मात्र दोरीमधून आपणास जो साप दिसतो त्यामध्ये सहकारी कारणांचा अत्यंत अभाव आहे.  म्हणून साप हा दोरीतून निर्माण झाल्यासारखा वाटला तरी तो कल्पितच आहे.  त्यामुळे दोरी व साप यांच्यामध्ये जसा कारण-कार्यभाव नाही, तसेच परब्रह्मामधून हे विश्व प्रत्यक्ष उत्पन्नच झालेले नाही.  कारण येथे परब्रह्माशिवाय अन्य वस्तु अस्तित्वातच नसल्यामुळे सहकारी कारणांचाही अभाव आहे.

 

म्हणून ब्रह्म व विश्व यांच्यातही कारण-कार्य संबंध सिद्ध होत नाही.  त्यामुळे ब्रह्मस्वरूप हे अद्वय व अधिष्ठानरूप असून दिसणारे विश्व हे पूर्णतः मिथ्या, कल्पित आहे.  हाच येथे अभिप्राय आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ