Tuesday, June 24, 2025

साधुदर्शनाची पद्धती | Way Of Meeting A Saint

 




वसिष्ठ मुनि येथे साधुदर्शनाची पद्धती सांगतात.  साधूंचे रोजच सहज दर्शन मिळाले, तर डोके टेकवायचे आणि दर्शन घ्यायचे हा केवळ एक उपचार राहतो.  त्यामध्ये भावाची जागृति होत नाही.  नमस्कारामध्ये किंवा दर्शनामध्ये बाह्य क्रिया महत्त्वाची नाही.  आपण जसे बाहेरचे विषय पाहतो, तसे पाहणे म्हणजे दर्शन नाही.  दर्शन आणि नमस्कार हा मनाचा एक नतमस्तक भाव आहे.

 

साधु किंवा गुरु ही एक व्यक्ति किंवा शरीर नाही.  विश्वामधील अन्य माणसांच्याप्रमाणे एखादा मर्त्य मनुष्य नाही.  आपला कोणी आप्त, बंधु किंवा नातेवाईक सुद्धा नाही.  म्हणून महापुरुषांशी कोणीही कोणतेही नाते सुद्धा जोडू नये.  त्यांच्याकडे कोणत्याही नात्याने पाहू नये.  कारण असे महापुरुष किंवा गुरु म्हणजे तत्त्व असून साक्षात् परब्रह्मस्वरूप आहेत.  भगवान शिव सुद्धा माता पार्वतीला गुरुस्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात –  

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |  गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||  (गुरुगीता)

या तत्त्वाकडे पाहताना साधकाचा भाव अत्यंत शरणागतीचा हवा.  या भवसागरामधून पार नेण्यासाठी साधकाने गुरूंच्या चरणी प्रार्थना करावी.  त्यासाठी आत्मज्ञानाची याचना करावी.

 

वसिष्ठ मुनि येथे हीच व्याकुळता सांगतात.  गुरुंच्याकडे केवळ शरीराने नव्हे तर मनाने जावे.  गुरुदर्शनाची मनामध्ये ओढ आणि व्याकुळता हवी.  ती सत्संगाची-ज्ञानाची व्याकुळता आहे.  म्हणून हे रामा !  दरिद्री माणूस जसा हिरे-माणके पाहण्यासाठी उत्सुक असतो, तसेच साधकाला सत्संगामध्ये जाण्याची, साधुदर्शनाची, ज्ञानश्रवणाची व साधनेची तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे.  गुरूंचे उपदेशामृत श्रवण करण्यासाठी चातकाप्रमाणे आतूर झाले पाहिजे.  त्याशिवाय सत्संगाचे - गुरूंचे महत्त्व समजत नाही.  गुरुंच्याजवळ कसे जावे, कसे दर्शन घ्यावे, त्यांच्याशी कसे बोलावे, याचे शिष्टाचार आहेत.  केवळ शरीराने जवळ राहून उपयोग नाही.  जोपर्यंत भाव उदयाला येत नाही, तोपर्यंत सत्संगाचा उपयोग होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ