या अनंत, सर्वशक्तिमान, महान असणाऱ्या
आत्मतत्त्वापासून उत्पन्न झालेल्या संकल्पशक्तीच्या रूपाला 'मन' असे म्हणतात. म्हणून संकल्प म्हणजेच मन आहे. "हे
सत् आहे की असत् आहे ?" याप्रमाणे मनुष्यामध्ये
जो अस्थिर भाव उत्पन्न होतो, जेथे निश्चय झालेला
नसतो, त्या द्वंद्वात्मक भावाला मन असे म्हणावे. या अवस्थेमध्ये दोलायमान स्थिति असते. "हे की
ते?" अशी संभ्रमावस्था असते.
ज्या स्थितीमध्ये जीव प्रकाशस्वरूप
आत्मचैतन्याला जाणत नाही, त्यामुळे तो अज्ञानी जीव स्वतःला कर्म करणारा कर्ता म्हणवून
घेतो, जीवाच्या या भ्रामक अवस्थेलाच मन असे म्हणतात. हे राघवा ! कल्पनेशिवाय व क्रियाशक्तिशिवाय मनाचे अस्तित्व शक्य
नाही. ज्याप्रमाणे या जगात गुणहीन मनुष्य गुणी
असू शकत नाही, त्याचप्रमाणे मन कल्पनेशिवाय आणि क्रियाशक्तिशिवाय अस्तित्वात राहू शकत
नाही. म्हणून जेथे जेथे कल्पना व कर्म दिसते
तेथे मन आहेच. कारण सर्व कल्पना व कर्मे यांचे
उगमस्थान मन आहे.
हे रामा ! ज्याप्रमाणे अग्नि आणि उष्णता या दोन्हींची सत्ता
भिन्न नसते, त्याचप्रमाणे कर्म व मन एकरूप असतात. तसेच जीव व मनही एकरूप असतात. म्हणून 'कर्म-मन' व
'जीव-मन' हेही भिन्न नाहीत. त्यामुळे सिद्ध
होते की, कर्म आणि जीव हेही एकरूपच आहेत. आपल्या
संकल्परूप शरीराने म्हणजे चित्तरूपी कर्माने व कर्मफळांच्या रूपाने या जगाचा भयंकर
मोठा विस्तार केला आहे. सोप्या भाषेत सांगावयाचे
झाले तर, चित्त संकल्प करते, त्यामुळे जीव कर्म करतो. मग त्या जीवाला कर्माचे फळ प्राप्त होते. अनेकविध योनि प्राप्त होतात. याप्रमाणे संसाराचा विस्तार होतो.
वासना व कल्पनांचा विस्तार म्हणजेच हे जग आहे.
या विश्वामध्ये ज्या ज्या जीवाने ज्या पदार्थामध्ये
जशी वासना निर्माण केली असेल ती वासनाच त्याला तसतसे फळ प्राप्त करवून देते. म्हणजे
वासनेनेच कर्म घडते व कर्मानुरूप जीवाला फळ प्राप्त होते. म्हणून हे राघवा ! मनस्पंदनरूपी कर्म हेच या संसार वृक्षाचे बीज
आहे. सर्व क्रिया म्हणजे विविध शाखा असून कर्मफळे
म्हणजे या संसारवृक्षाची विचित्र फळे आहेत. थोडक्यात मनापासूनच हा सर्व संसारवृक्ष उत्पन्न होतो.
मन जसजसे कल्पना करते तसतशी इंद्रिये त्या
त्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात. म्हणून "कर्म म्हणजे मन आहे" असे म्हटले
आहे.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–











