Tuesday, May 24, 2016

मृगजळापासून शिकवण | Lessons from a Mirage


वाळवंटामध्ये सर्वत्र वाळूचे साम्राज्य असते.  प्रखर उन्हाळ्यात त्या वाळूवर सूर्याचे तप्त किरण पडल्यावर वाळू चमकते.  त्यावेळी तेथे एखाद्या तृषार्त झालेल्या मनुष्याला त्या वाळूवर वाळू न दिसता पाणी दिसते.  पाणी दिसल्याबरोबर त्याला एकदम बरे वाटते.  “ लवकरात लवकर तेथे जावे आणि ते पाणी पिऊन तहान शांत करावी ”, या कल्पनेने तो तृषार्त झालेला मनुष्य वाळवंटामध्ये धावतो, चालतो-चालतो आणि त्याच्या लक्षात येते की, जितका तो पाण्याच्या दिशेने जातो, तितके ते पाणी पुढे-पुढे जात आहे.

जे पाणी त्याची तहान भागवू शकेल, असे खरे पाणी त्याला कधीही प्राप्त होत नाही.  त्यानंतर त्याच्या डोळ्यांना पाणी दिसते, परंतु तोच मनुष्य बुद्धीने विचार करतो की, “ ज्याच्यासाठी मी धावत आहे, ज्याला मी डोळ्यांनी पाणी म्हणून पाहत आहे, तेथे पाणी नाही तर फक्त पाण्याचा एक भास आहे. ”  हे विचारांनी तो जाणतो आणि शांत होतो.

या दृष्टांतामध्ये त्या मनुष्याची प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था होते.  पाणी घेण्यामध्ये ही प्रवृत्ति नाही आणि पाणी त्याग करण्यामध्ये सुद्धा प्रवृत्ति नाही.  म्हणजे प्रवृत्तीही नाही आणि निवृत्ति सुद्धा नाही.  डोळ्यांना पाणी दिसते, परंतु बुद्धीने त्याच पाण्याचा निरास केलेला आहे.  पाण्यामधील सत्यत्वबुद्धीचा विचाराने निरास होऊन त्या मनुष्याला प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था प्राप्त होते.

आजपर्यंत संसारामधून कोणीही शाश्वत सुख, सार किंवा तथ्य पाप्त केलेले नाही.  “ हा संसार करून मला खरोखरच नित्य फळ मिळणार की अनित्य फळ मिळणार ? ”  यामध्ये साधकाने विचार करावा.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment