जोपर्यंत
मृगजळाचे खरे स्वरूप समजत नाही, तोपर्यंत तो भास सत्य वाटतो. यामुळे प्रत्यक्षामध्ये तेथे पाणी
नसूनही पाणी आहे असे वाटून हरीण तहान शमविण्यासाठी त्या दिशेने धावते. इतकेच नव्हे तर, मनुष्य सुद्धा पाण्याच्या
दिशेने जातो. परंतु स्वानुभवाने जेव्हा
ते पाणी नाही तर, पाण्याचा केवळ भासच आहे हे समजते, त्यानंतर डोळ्यांनी जरी पाणी
पाहिले तरी मनुष्यामध्ये प्रवृत्ति दिसत नाही.
त्याचप्रमाणे
जोपर्यंत या दृश्य विश्वाचे असलेले अधिष्ठान – परब्रह्मस्वरूप समजत नाही
तोपर्यंत बुद्धि विश्वाला सत्यत्व देते आणि या सत्यत्वबुद्धीमुळेच मनामध्ये
विषयकामना निर्माण होते. असत्य,
खोट्या विषयाची कामना कधीही निर्माण होत नाही. म्हणून सत्यत्वबुद्धीमुळे कामना निर्माण होते
आणि कामनापूर्तीसाठी मनुष्य अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त
होतो. याप्रमाणे तो कामना-कर्म-कर्मफळ
पुन्हा कामना अशा चक्रामध्ये अडकतो.
परंतु ज्यावेळी
तत्त्वविचाराने विश्वाच्या मागे असलेले विश्वाचे खरे सत्य समजते त्यावेळी आपोआपच
विश्वाला बुद्धीने दिलेले सत्यत्व नाहीसे होते, विश्वाचे मिथ्या स्वरूप समजते आणि
मनाने निर्माण केलेल्या प्रवृत्ति आणि निवृत्ति या वृत्तींचा निरास होतो. त्यानंतर तो ज्ञानी पुरुष विश्वाच्या मागे
धावत नाही आणि विश्वापासून पाळूनही जात नाही. तर तो विश्वामध्ये राहूनच विश्वापासून अलिप्त
राहातो. सर्व प्रकारची कर्मे करूनही
अंतरंगामधून साक्षीस्वरूपाने राहून अकर्ता-अभोक्तास्वरूप असलेल्या
आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहातो.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment