विश्वामध्ये द्रष्टा (Subject) आणि दृश्य (Object) असे
दोन भिन्न स्वरूपाचे घटक आहेत. त्यामध्ये
कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही.
१. प्रत्येक दृश्य, अनुभवयोग्य असणारी वस्तु ही निर्माण झालेली निर्मित कार्य असते.
२. निर्माण झालेल्या प्रत्येक निर्मित
वास्तूला सुरुवात म्हणजेच उत्पत्ति असते आणि निसर्गनियमाप्रमाणे साहजिकच
त्या प्रत्येक वास्तूला शेवट म्हणजेच नाश असतो.
३. घट ही दृश्य, निर्मित, कार्य वस्तु असून ती
उत्पत्तिस्थितिलययुक्त आहे. निर्मित
वास्तूला 'प्रागभाव' आणि 'प्रध्वंसाभाव' असतात.
४. प्रत्येक निर्मित वस्तु ही 'देशकालवस्तुपरिच्छिन्न' असते. प्रत्येक वस्तूला
विशिष्ट अशी लांबी-रुंदी-उंची असते. यालाच
भौतिकशास्त्रात वास्तूचे आकारमान असे म्हणतात. यामुळे वस्तु आहे त्याच्यापेक्षा कधीही लहान
अथवा मोठी होऊ शकत नाही. तसेच प्रत्येक
वस्तु कालपरिच्छिन्न आहे. तिला
जन्म-मृत्यु अटळ आहे. ती
उत्पत्तिस्थितिलययुक्त असल्यामुळे ती कधीही नित्य, शाश्वत, चिरंतन राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक वस्तु ही अनित्य, नाशवान, कालबद्ध
आहे आणि ती प्रत्येक वस्तु वस्तुपरिच्छिन्न आहे. म्हणजेच एक वस्तु कधीही दुसरी वस्तु होऊ शकत
नाही.
५. प्रत्येक निर्मित, दृश्य वस्तु ही जड, अचेतन स्वरूपाची असते. तिला स्वतःची स्वतंत्र चेतना नसते.
६. यामुळेच वास्तूला स्वतःलाच स्वतःची
जाणीव नसते. मी घट आहे, मी टेबल आहे, अशी
जाणीव घटाला अथवा टेबलाला होत नाही. या
वस्तूंना स्वतःची, स्वतःच्या अस्तित्वाची
तर जाणीव नसतेच, परंतु अन्य वस्तूंचीही जाणीव
नसते.
७. या सर्व निर्मित वस्तु कालबद्ध
असल्यामुळे त्या कधीही शाश्वत राहात नाहीत. काळामध्येच त्या निर्माण होतात. काही काळ अस्तित्वामध्ये राहतात आणि काळामध्येच
नाश पावतात.
८. अशा या निर्मित वस्तूंच्यामध्ये नानात्व, अनेकत्व आहे. या विश्वात असंख्य, अगणित नामरूपे आहेत. हेच सर्व दृश्य
विश्वाचे, विषयांचे स्वरूप आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–