Tuesday, August 19, 2025

मंत्रिमंडळ आणि विजयश्री | Ministers And Victory

 



ज्याप्रमाणे ज्या राजाजवळ प्रधानादि मंत्रिमंडळ असते, तोच राजा विजयी होतो.  ज्याच्याबरोबर मंत्रणा म्हणजे विचारविनिमय केला जातो, त्याला 'मंत्री' असे म्हणतात.  राज्यामध्ये कोणत्याही बाबतीत राजा प्रथम स्वतः विचार करून नंतर आपल्या मंत्रिमंडळाबरोबर त्याची चर्चा करतो आणि चर्चेनंतरच सांगोपांग विचार करून निर्णय घेतो.  जेथे अविचारी, स्वार्थी व भ्रष्ट मंत्री आहेत, त्या राष्ट्राचे अधःपतन होते.  मात्र ज्या राजाजवळ श्रेष्ठ, विचारी, निःस्वार्थ मंत्री असतात, त्याच राजाला विजयश्री प्राप्त होते.

 

त्याचप्रमाणे हे रामा !  साधकाजवळ शम, विचार, संतोष व सत्संग हेच जणु काही चार मंत्री आहेत. म्हणून साधकाने कोणताही व्यवहार करताना प्रथम यांच्याशी विचारविनिमय करावा.  म्हणजेच साधकाने तृप्तीलाच काय पाहिजे ?  असे विचारले तर कामनांचा त्याग होईल.  विचारला काय पाहिजे ?  असे विचारले तर विचार नित्य वस्तूचे ग्रहण करेल.  शमयुक्त मनाला विचारणा केली तर ते मनही अंतर्मुख असल्यामुळे साधकाला शांतीशिवाय काही मागणार नाही आणि सत्संगामध्ये गेलो तर साधु पुरुष या साधकाचे मन ईश्वरचिंतनामध्ये प्रवृत्त करतील.

 

म्हणून हे चार गुण म्हणजेच जणु काही साधकाचे अत्यंत जवळचे मंत्री आहेत.  जो साधक प्रत्येक बाबतीत त्यांच्याशी विचारविनिमय करतो, त्या चार गुणांना विचारून निर्णय घेतो, त्यालाच विजयश्री प्राप्त होते.  असा श्रेष्ठ साधक आत्मसाम्राज्यावर आरूढ होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, August 12, 2025

मनुष्य जीवनाच्या यशाचे परिमाण | Human Life Success Measure

 



मनुष्य जीवनामध्ये, आपल्या ६०-७०-८० वर्षांच्या आयुष्यामध्ये बाकी सर्व गोष्टी करतो.  शालेय शिक्षण घेतो.  जीवनामधील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडण्याचा झटून कसोशीने प्रयत्न करतो.  पैसा मिळवितो.  नोकरी करतो.  धंदा करतो.  अनंत इच्छा, कामाना निर्माण करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.  आपले शारीरिक जीवन सुखी करण्यासाठी नाना प्रकारच्या औषधींचे सेवन करतो.  पथ्ये पाळतो.  व्यायाम करतो.  प्राणायाम करतो.  योगाभ्यास करतो.  इंटरनेटवरून सर्व जगाची माहिती गोळा करतो.  मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.  अनेक उपाययोजना करतो.  म्हणजे मन अनेक ठिकाणी गुंतविण्याचा प्रयत्न करतो.  त्यासाठी वेळात वेळ काढून थोडा वेळ आपल्यामधील कलागुणांना वाव देतो.  संगीत वगैरेदि कला शिकतो.

 

मनुष्य इतका विचित्र प्राणी आहे की, त्याला एकाच जन्मामध्ये या सर्व गोष्टी करायच्या असतात.  मनुष्य आपल्या बुद्धीची भूक शमविण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्रज्ञान घेतो.  शोध करतो.  परंतु हे सर्व करूनही त्याचे मन शांत, तृप्त होत नाही.  त्याच्या बुद्धीमधील ज्ञानाची जिज्ञासा पूर्णतः निवृत्त होत नाही, कारण या सर्व बहिरंगाच्या प्रगतीने जीवनामधील त्याचा मूळ प्रश्न सुटलेलाच नसतो.  म्हणूनच अनादि काळापासून मानव अंतरिक सुख, शांति, तृप्ति, परिपूर्णता शोधतोय.  ही परिपूर्णता प्राप्त करावयाची असेल तर मनुष्याने योग्य विचार करणे आवश्यक आहे.  म्हणूनच श्रुति येथे प्रत्येक मनुष्याला ईशारा देत आहे – इह चेत् अवेदित् |

 

या मनुष्यजन्मामध्ये येऊन आत्मस्वरूपाला जाणले तर जीवन जगण्यात काही अर्थ आहे.  अन्यथा केवळ भोगासक्त होऊन जनावरांच्याप्रमाणे जीवन जगत राहिले, तर तो जीवनाचा महान नाश आहे.  संत कबीर म्हणतात –  

तूने रात गवाई सोयके |  दिवस गावाया खायके |

हिरा जनम अमोल था |  कवडी बदले जाय रे ||         (संत कबीर)

म्हणून जन्ममृत्युरूपी, शोकमोहरूपी संसारचक्रामधून मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मस्वरूपाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.  हेच श्रुति येथे स्पष्ट करीत आहे.

 


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ



Tuesday, August 5, 2025

शूर पुरुषाची व्याख्या | Definition Of Brave Man

 



श्रीवसिष्ठ मुनींनी पुन्हा एकदा शूर पुरुषाची व्याख्या केली आहे.  जो राजा स्वतः शास्त्रार्थाचे व लोकाचाराचे यथार्थ पालन करतो, ज्याचे राष्ट्र धर्मावर आधारलेले आहे, अशा राष्ट्राचा जो भक्त आहे, त्याला शूर असे म्हणावे.  येथे श्रीवसिष्ठांनी जाणीवपूर्वक शूराचे लक्षण भक्ति हे सांगितले आहे.  अन्यथा जगामध्ये शूरवीर, पराक्रमी लोक कमी नाहीत.  अन्यायी, भ्रष्टाचारी, दहशतवादी, आतंकवादी हे लोक सुद्धा प्रचंड धाडसी पण आततायी आहेत.  जीवावर उदार होऊन विध्वंस करणाऱ्या या अधर्मी लोकांच्यामध्ये सुद्धा शारीरिक बल आहे, पराक्रम आहे.  परंतु त्यांना कोणी शूर किंवा पराक्रमी म्हणत नाही.

 

मात्र ज्या वीर योध्यांच्या हृदयामध्ये देशभक्ति आहे, धर्मनिष्ठा आहे, जे स्वतः धर्मपरायण आहेत, अशा राष्ट्रभक्तांनाच शूर असे म्हणणे योग्य आहे.  भूमीला केवळ भूमी म्हणून ना पाहता राष्ट्रभूमीला माता मानून त्यापुढे नतमस्तक होऊन त्या भूमीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुति देणारे भूमिपुत्र हेच खरे शूर आहेत.  सामर्थ्य केवळ बाह्य शक्तीने किंवा शरीराने येऊ शकत नाही.  युद्धभूमीवर जावयाचे असेल, रणांगणावर वीरश्रीचा संचार व्हावयाचा असेल तर अंतःकरणामध्ये धर्म, देश, राष्ट्र यांच्याबद्दल नितांत भक्ति हवी.  अधर्माबद्दल, अन्यायाबद्दल प्रखर क्रोध हवा.  तोच वीरपुरुष धर्मासाठी व धर्माधीष्ठित राष्ट्रासाठी प्राणपणाने लढू शकेल.

 

म्हणून आपण धर्म व अधर्म, यापैकी कोणत्या पक्षामध्ये आहोत ?  याला महत्त्व आहे.  आपल्यापुढे संपूर्ण इतिहासाची साक्ष आहे.  राम-रावण युद्धामध्ये रावणाचा भाऊ असणाऱ्या विभीषणाने रावणाचा म्हणजे अधर्माच्या पक्षाचा त्याग करून रामाच्या-धर्माच्या पक्षाचे अनुसरण केले.  म्हणून महापराक्रमी रावणापेक्षाही विभीषणाची सत्कीर्ति अक्षय आहे.  या भारतवर्षामध्ये जन्माला आलेले भरत, रन्तिदेव आदि अनेक राजे हे महाबलाढ्य असून धर्मनिष्ठ व राष्ट्रभक्त होते.  जेथे भक्ति असते तेथेच निष्ठा असते.  म्हणून वीर योध्यांमध्ये धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल व राष्ट्राबद्दल एकनिष्ठा व भक्ति असणे, हे वीर योध्याचे प्रमुख लक्षण आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ