Tuesday, July 29, 2025

तुल्य निंदास्तुति | Balanced In Criticism And Praise

 



मनुष्यामध्ये असलेल्या आणि नसलेल्या दोषांचे प्रत्यक्षतः वर्णन करणे म्हणजे 'निंदा' होय.  तसेच मनुष्यामध्ये असलेल्या किंवा नसलेल्या गुणांचे प्रत्यक्षतः वर्णन करणे म्हणजेच 'स्तुति' होय.  ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, त्यावेळी त्याचे सर्व दोष आपण सांगतो.  इतकेच नव्हे तर जे दोष त्याच्यामध्ये नाहीत ते सुद्धा त्याच्यावर लादतो.  आपले मन पूर्वग्रहदूषित असल्यामुळे आपण त्या व्यक्तीवर अनेक दोषारोप करतो.  त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांना सुद्धा आपण दोषांचे स्वरूप देतो.  यालाच 'निंदा' असे म्हणतात.  तसेच, एखाद्या व्यक्तीची स्तुति करीत असताना बोलण्याच्या ओघात अनेक गुणांचे वर्णन करतो.  जे गुण नसतील तेही वर्णन करतो.  विनाकारण स्तुति करीत असतो.

 

या निंदा व स्तुतीमुळे मनामध्ये १) हर्ष - संतोष, २) विषाद या दोन परस्परविरोधी वृत्ति निर्माण होतात.  स्वतःची स्तुति, प्रशंसा श्रवण केल्याने मनुष्य सुखावतो.  त्याला एकदम बरे वाटते.  मनुष्य आनंदाने accept करतो.  मात्र निंदा प्रतिकूल असल्यामुळे कोणी जर आपली निंदा केली तर मनुष्याला एकदम दुःख होते.  मनुष्य सहन करू शकत नाही.  याचे कारण, आपल्यामधील दोष तो मान्य करीत नाही.  उलट ते दोष हे दोष नसून गुण कसे आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.  त्यावेळी तो अत्यंत उद्विग्न होतो.  More and more you try to defend yourself, more you defy yourself.  जसे सूर्याला मी प्रकाशस्वरूप आहे, हे सिद्ध करण्याची गरजच नाही, कारण ते त्याचे स्वयंसिद्ध स्वरूप आहे.  तसेच आपल्यामध्ये जर गुण असेल तर तो सिद्ध करण्याची गरज नाही आणि मनुष्य तो सिद्ध करण्याचा जितका प्रयत्न करतो तितका तो अयशस्वी होतो.

 

म्हणून प्रथम आपले दोष मान्य न करणे ही चूक आहे.  त्यामुळे कितीही वर्षे सर्व शास्त्रांचे श्रवण, अध्ययन केले तरीही उपयोग होत नाही.  बाहेरून मनुष्य बदलला, स्वतःला साधक, जिज्ञासु म्हणवून घेतले तरीही मनामध्ये मात्र काहीही प्रगति करू शकत नाही.  त्याचे फार मोठे नुकसान होते.  म्हणून प्रत्येक साधकाने आपले दोष मान्य करावेत.  म्हणजे ते दोष सुधारता येतात.  यामुळेच ज्ञानी पुरुष निंदा व स्तुति या दोन्हींच्यामध्येही समतोल राहातो.  तो स्तुतीप्रमाणेच निंदा सुद्धा आनंदाने मान्य करतो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Monday, July 21, 2025

सत्संग त्यागू नये | Never Quit Satsang

 



अनेक लोक सत्संग करतात.  गुरुमुखामधून शास्त्रश्रवण करतात.  काही काळ साधना करतात.  परंतु काळाच्या ओघात त्यांच्या मनामध्ये अभिमानादि दोष निर्माण होऊन त्यांच्या मनात विकल्प, संशय, शंका निर्माण होतात.  काही वेळेस बाह्य विषयासक्ति निर्माण होऊन सत्संगाचे महत्त्व कमी होते.  श्रद्धा डळमळीत होते आणि तो साधक गुरूंच्यापासून मनाने दूर जातो.  श्रवणाचा त्याग करतो किंवा शास्त्राचे शाब्दिक ज्ञान गुरुंच्याकडून घेतल्यानंतर तो दुसऱ्यांना त्याचा उपदेश करू लागतो.  त्यावेळी त्याला वाटते की, आता आपल्याला ज्ञानाची, गुरूंची आवश्यकता नाही.  किंवा काही वेळेस साधक संसारजंजाळामध्ये फासून सत्संगाचा त्याग करण्याची शक्यता असते.  सत्संगाचा त्याग केला तर क्रमाने साधकाचे अधःपतन होते.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, जो कधीही साधुसंग सोडत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये सतत नित्यानित्याचा विवेक जागृत राहतो आणि तीच बुद्धि सर्व विवेकी पुरुषांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ असते.  अन्यथा जे सत्संगाचा त्याग करतात, त्यांच्यामधील शम-विचार-संतोष हेही गुण क्रमशः नाहीसे होतात.

 

ज्या साधु पुरुषांनी आपल्या अंतःकरणामधून अविद्या-काम-कर्मग्रंथीचा भेद केला असून जे सर्वमान्य आहेत, ज्यांच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, अशा साधु पुरुषांची साधकाने सर्व प्रकारच्या उपायांनी सेवा करावी.  कारण संसारसागरामध्ये सत्संग आणि गुरुसेवा हाच एकमात्र तरून जाण्याचा उपाय आहे.  शास्त्रामध्ये गुरुसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  सेवेमध्ये भाव पाहिजे.  सेवेमध्ये व्यक्तिगत राग-द्वेष, आवड-नावड तसेच अहंकाराचा सुद्धा त्याग झाला पाहिजे.  सेवा करताना सर्वस्वाचा त्याग करावा.  त्यासाठी दास्यत्व, दीनभाव म्हणजे शरणागतीचा भाव निर्माण झाला पाहिजे.  तरच सेवा शक्य आहे.  साधकाने शरणागत भावाने गुरूंची-साधूंची सेवा करावी.  श्रीमद्भागवतामध्येही म्हटले आहे - महत्सेवां द्वारं आहुः मुक्तेः |  महात्म्यांची सेवा हे मुक्तीचे द्वार आहे.  म्हणून साधकाने गुरूंची सेवा करावी.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, July 15, 2025

स्वप्नामधील अपूर्वता | Incredibility In Dreams

 




स्वप्नामध्ये अपूर्व पदार्थ हे स्थानीचा अपूर्व धर्म आहे.  स्थानी म्हणजेच स्वप्नस्थानामधील स्वप्नद्रष्टा पुरुष होय.  स्वप्नद्रष्टा पुरुष स्वप्नामध्ये जे जे काही अपूर्व पाहतो, ते सर्व त्या स्वप्नद्रष्ट्याचेच धर्म असतात.  ते अपूर्व पदार्थ स्वयंसिद्ध नसून स्वप्नपुरुषाचेच धर्म असतात.

 

ज्याप्रमाणे, स्वर्गामध्ये राहणाऱ्या इंद्राला हजार डोळे असणे, हा त्याचा धर्म आहे.  स्थानमहात्म्यामुळे इंद्राला सहस्त्राक्षत्वादि धर्म प्राप्त होतात.  त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्ट्याला सुद्धा कधी-कधी अपूर्व विषय पाहण्याचे अपूर्व सामर्थ्य प्राप्त होते.  यामुळे स्वप्नद्रष्टा काही वेळेला स्वप्नामध्ये आपल्याच मनामधील विकल्पांना, कल्पनांना अपूर्व दृश्याच्या रूपामध्ये पाहतो.  हा अपूर्व धर्म स्वप्नद्रष्ट्याच्या स्वस्वरूपाप्रमाणे स्वतःसिद्ध नाही, तर स्वप्नपुरुष स्वप्नामध्ये आपल्या मनामधील वासनारूपी सूक्ष्म संस्कार अपूर्व दृश्यरूपाने पाहतो.  हे तर सहज स्पष्ट आहे. यामध्ये काही आश्चर्य नाही.

 

ज्याप्रमाणे एखादा सुशिक्षित मनुष्य देशदेशांतराचे मार्ग समजावून घेऊन भिन्न-भिन्न देशांना, स्थानांच्यामध्ये जाऊन तेथे विशिष्ट असे पदार्थ पाहतो, त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्टा पुरुष सुद्धा स्वप्नामध्ये जाऊन तेथे अपूर्व, विशिष्ट पदार्थ पाहतो.  स्वप्नविश्व हे वासनामय विश्व आहे.  म्हणूनच विशेष स्थानामध्ये म्हणजेच जागृतावस्थेत रज्जुसर्प, मृगजळ इत्यादि अनेक पदार्थ जागृत पुरुषाला दिसत असूनही ते मिथ्या, असत् असतात.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्नपुरुषाला दिसणारे दृश्य पदार्थही असत् असतात.

 

जसे जागृतावस्थेत दोरीवर साप दिसतो, वाळूच्या जमिनीवर पाणी दिसते.  यामध्ये साप हा बाहेर कोठे दिसत नसून दोरी या अधिष्ठानामध्येच दिसतो.  पाणी हे जमिनीच्या अधिष्ठानावरच दिसते.  म्हणून येथे अधिष्ठानभूत दोरी किंवा पाणी हेच सत्य असून दिसणारा सर्प व मृगजळ हे मिथ्या आहेत.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये दिसणारे सर्व दृश्य पदार्थ हे स्वप्नाचे अधिष्ठान असणाऱ्या स्वप्नद्रष्ट्याचे - स्थानीचे धर्म आहेत.  अधिष्ठानभूत स्वप्नद्रष्टा हा सत्य असून स्वप्नात दिसणारे सर्व स्वप्नदृश्य पदार्थ मात्र अध्यस्त, भासमान, रज्जुसर्पाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, कल्पित-मिथ्या-असत् स्वरूपाचे आहेत.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ



Tuesday, July 8, 2025

संग आणि संगविवर्जित | Attachment And The Unattached

 



ज्ञानी पुरुष स्वतःच्या मनामधील पूर्वग्रहदूषित कल्पना, रागद्वेष, कलुषितता काढून अत्यंत शुद्ध, स्वच्छ, रागद्वेषरहित मनाने विश्वाकडे पाहातो.  त्याला सर्व विश्वामध्ये शुद्धतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूति येते.  तो शीत-उष्ण, सुख-दुःख या सर्व द्वन्द्वांच्यामध्ये समतोल राहातो.  तोच 'सङ्ग्विवर्जितः' होतो.  असंगस्वरूप होतो.  याठिकाणी आचार्य प्रथम 'संग' या शब्दाचा अर्थ सांगतात.  मान-अपमान, शीत-उष्ण वगैरेदींचा अनुभव अहंकार घेतो.  हा अहंकार साभास म्हणजेच अज्ञानजन्य असून मिथ्या स्वरूपाचा आहे.  अहंकाराला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  अशा मिथ्या, भासात्मक अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच मी कर्ता-भोक्ता, सुखी-दुःखी, जन्ममृत्युयुक्त, संसारी हे सर्व अध्यास निर्माण होतात.  या अध्यासालाच 'संग' असे म्हणतात.

 

अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळेच जीव संसाराचा, सुख-दुःखांचा अनुभव घेतो.  वास्तविक पाहाता अहंकार सुद्धा मिथ्या, भासात्मकच आहे.  आत्मचैतन्यामध्येच आश्रित, अध्यस्त आहे.  अहंकाराला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून ती आत्मचैतन्याचीच सत्ता आहे.  आत्मचैतन्याच्या सत्तेमुळेच अहंकाराचे रक्षण, वर्धन, पोषण होते.  हा जसा जसा वाढायला लागतो तसतसा तो आपल्या अधिष्ठानाला - आत्मचैतन्याला विसरतो.  प्रत्येक प्रसंगामधून सतत 'मी' - 'मी' असे अस्तित्व दर्शवितो.

 

एखादे भूत जसे हात धुऊन मागे लागते तसेच प्रत्येक जीवाच्या मागे अहंकाररूपी भूत लागलेले आहे.  हा अहंकार मनुष्याला गुलाम बनवून नाचवितो, भ्रमिष्ट करतो.  स्वस्वरूपापासून च्यूत करून मनुष्याचा नाश करतो.  मनुष्याभोवती कल्पनांचे जाळे तयार करून त्या जाळ्यामध्ये घट्ट अडकवितो.  क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येतो.  त्या अहंकाराशी तादात्म्य पावणे म्हणजेच 'संग' आहे.  परंतु अहंकाराशी जो तादात्म्य पावत नाही तोच 'सङ्ग्विवर्जित', ज्ञानी पुरुष आहे.  तो आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने अज्ञानाचा ध्वंस करून अहंकाराचा पूर्णतः निरास करतो.  यामुळे अहंकारामधून निर्माण झालेल्या मान-अपमान, सुख-दुःख या कल्पनांचाही पूर्णतः निरास होतो.  तोच सङ्ग्विवर्जित, संगरहित होतो.  त्याचा अहंकार म्हणजेच 'कार' प्रत्यय निरास झाल्यामुळे राहाते ते असंगस्वरूप, आत्मस्वरूप !  त्या स्वरूपामध्ये स्थिर झाल्यामुळे तो समदर्शी होतो.  त्याचा अहंकार पूर्णतः गळून पडतो.  विरून जातो.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, July 1, 2025

दृश्य जगाचे मूळ कारण काय? | Root Cause Of Visible Universe

 




हे जग डोळ्यांना दिसत आहे.  दिसत असेल तर ते नक्कीच उत्पन्न झाले आहे आणि जग उत्पन्न झाले असेल तर त्या जगाला काहीतरी कारण हे असलेच पाहिजे.  करणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची सिद्धि होत नाही, असा न्याय आहे.  मग येथे दिसणारे हे विश्व कोठून व कसे उत्पन्न झाले ?  हा प्रश्न आहे.

 

म्हणून विश्वाच्या कारणाचा सर्वजण शोध घेत आहेत.  परंतु जसे रज्जु-सर्प दृष्टांतामध्ये आपल्याला साप दिसतो.  तो साप कोठून उत्पन्न झाला ?  असा विचार करू लागलो तर तो साप दोरीमधून उत्पन्न झाला, हे त्याचे उत्तर आहे.  पण असे उत्तर मिळाले तरी सापाची प्रत्यक्ष निर्मिती झालेलीच नाही, ही वस्तुस्थिति आहे.  तरीही जोपर्यंत आपणास तो साप दिसत आहे, तो खरा वाटत आहे, तोपर्यंत आपणास दुसरा पुरुष समजावून देतो की, “अरे !  तुला जरी तो साप दिसत आहे, तो दोरीमधून उत्पन्न झाल्यासारखा वाटत आहे”, तोपर्यंतच दोरी हे त्या सापाचे कारण आहे.

 

परंतु ज्यावेळी आपणास समजेल की, अरे !  हा खरा साप नसून केवळ भास आहे, दोरीच केवळ सत्य आहे.  साप वस्तुतः उत्पन्नच झालेला नाही.  त्यामुळे सापाच्या निर्मितीचे खरे कारण दोरी असूच शकत नाही.  म्हणून दोरी व साप यांच्यामध्ये कारण-कार्यभाव शक्य नाही.  कारण येथील भ्रमात्मक सापाच्या निर्मितीमध्ये अन्य सहकारी कारणांचाही अभाव आहे.  त्यामुळे सिद्ध होते की, सापाची निर्मिती ही खरी नसून कल्पित आहे.

 

व्यवहारामध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष निर्मिती पाहतो तेव्हा तेथे मुख्य करणाबरोबरच अन्य सहकारी कारणे सुद्धा असतात.  जसे मातीपासून घट निर्माण होताना माती या कारणाबरोबरच पाणी, चाक वगैरेदि सहकारी करणे आहेत.  ही सर्व कारणे एकत्र येऊन घटाची प्रत्यक्ष निर्मिती होते.  मात्र दोरीमधून आपणास जो साप दिसतो त्यामध्ये सहकारी कारणांचा अत्यंत अभाव आहे.  म्हणून साप हा दोरीतून निर्माण झाल्यासारखा वाटला तरी तो कल्पितच आहे.  त्यामुळे दोरी व साप यांच्यामध्ये जसा कारण-कार्यभाव नाही, तसेच परब्रह्मामधून हे विश्व प्रत्यक्ष उत्पन्नच झालेले नाही.  कारण येथे परब्रह्माशिवाय अन्य वस्तु अस्तित्वातच नसल्यामुळे सहकारी कारणांचाही अभाव आहे.

 

म्हणून ब्रह्म व विश्व यांच्यातही कारण-कार्य संबंध सिद्ध होत नाही.  त्यामुळे ब्रह्मस्वरूप हे अद्वय व अधिष्ठानरूप असून दिसणारे विश्व हे पूर्णतः मिथ्या, कल्पित आहे.  हाच येथे अभिप्राय आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ