Monday, July 21, 2025

सत्संग त्यागू नये | Never Quit Satsang

 



अनेक लोक सत्संग करतात.  गुरुमुखामधून शास्त्रश्रवण करतात.  काही काळ साधना करतात.  परंतु काळाच्या ओघात त्यांच्या मनामध्ये अभिमानादि दोष निर्माण होऊन त्यांच्या मनात विकल्प, संशय, शंका निर्माण होतात.  काही वेळेस बाह्य विषयासक्ति निर्माण होऊन सत्संगाचे महत्त्व कमी होते.  श्रद्धा डळमळीत होते आणि तो साधक गुरूंच्यापासून मनाने दूर जातो.  श्रवणाचा त्याग करतो किंवा शास्त्राचे शाब्दिक ज्ञान गुरुंच्याकडून घेतल्यानंतर तो दुसऱ्यांना त्याचा उपदेश करू लागतो.  त्यावेळी त्याला वाटते की, आता आपल्याला ज्ञानाची, गुरूंची आवश्यकता नाही.  किंवा काही वेळेस साधक संसारजंजाळामध्ये फासून सत्संगाचा त्याग करण्याची शक्यता असते.  सत्संगाचा त्याग केला तर क्रमाने साधकाचे अधःपतन होते.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, जो कधीही साधुसंग सोडत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये सतत नित्यानित्याचा विवेक जागृत राहतो आणि तीच बुद्धि सर्व विवेकी पुरुषांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ असते.  अन्यथा जे सत्संगाचा त्याग करतात, त्यांच्यामधील शम-विचार-संतोष हेही गुण क्रमशः नाहीसे होतात.

 

ज्या साधु पुरुषांनी आपल्या अंतःकरणामधून अविद्या-काम-कर्मग्रंथीचा भेद केला असून जे सर्वमान्य आहेत, ज्यांच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, अशा साधु पुरुषांची साधकाने सर्व प्रकारच्या उपायांनी सेवा करावी.  कारण संसारसागरामध्ये सत्संग आणि गुरुसेवा हाच एकमात्र तरून जाण्याचा उपाय आहे.  शास्त्रामध्ये गुरुसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  सेवेमध्ये भाव पाहिजे.  सेवेमध्ये व्यक्तिगत राग-द्वेष, आवड-नावड तसेच अहंकाराचा सुद्धा त्याग झाला पाहिजे.  सेवा करताना सर्वस्वाचा त्याग करावा.  त्यासाठी दास्यत्व, दीनभाव म्हणजे शरणागतीचा भाव निर्माण झाला पाहिजे.  तरच सेवा शक्य आहे.  साधकाने शरणागत भावाने गुरूंची-साधूंची सेवा करावी.  श्रीमद्भागवतामध्येही म्हटले आहे - महत्सेवां द्वारं आहुः मुक्तेः |  महात्म्यांची सेवा हे मुक्तीचे द्वार आहे.  म्हणून साधकाने गुरूंची सेवा करावी.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ