Tuesday, July 15, 2025

स्वप्नामधील अपूर्वता | Incredibility In Dreams

 




स्वप्नामध्ये अपूर्व पदार्थ हे स्थानीचा अपूर्व धर्म आहे.  स्थानी म्हणजेच स्वप्नस्थानामधील स्वप्नद्रष्टा पुरुष होय.  स्वप्नद्रष्टा पुरुष स्वप्नामध्ये जे जे काही अपूर्व पाहतो, ते सर्व त्या स्वप्नद्रष्ट्याचेच धर्म असतात.  ते अपूर्व पदार्थ स्वयंसिद्ध नसून स्वप्नपुरुषाचेच धर्म असतात.

 

ज्याप्रमाणे, स्वर्गामध्ये राहणाऱ्या इंद्राला हजार डोळे असणे, हा त्याचा धर्म आहे.  स्थानमहात्म्यामुळे इंद्राला सहस्त्राक्षत्वादि धर्म प्राप्त होतात.  त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्ट्याला सुद्धा कधी-कधी अपूर्व विषय पाहण्याचे अपूर्व सामर्थ्य प्राप्त होते.  यामुळे स्वप्नद्रष्टा काही वेळेला स्वप्नामध्ये आपल्याच मनामधील विकल्पांना, कल्पनांना अपूर्व दृश्याच्या रूपामध्ये पाहतो.  हा अपूर्व धर्म स्वप्नद्रष्ट्याच्या स्वस्वरूपाप्रमाणे स्वतःसिद्ध नाही, तर स्वप्नपुरुष स्वप्नामध्ये आपल्या मनामधील वासनारूपी सूक्ष्म संस्कार अपूर्व दृश्यरूपाने पाहतो.  हे तर सहज स्पष्ट आहे. यामध्ये काही आश्चर्य नाही.

 

ज्याप्रमाणे एखादा सुशिक्षित मनुष्य देशदेशांतराचे मार्ग समजावून घेऊन भिन्न-भिन्न देशांना, स्थानांच्यामध्ये जाऊन तेथे विशिष्ट असे पदार्थ पाहतो, त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्टा पुरुष सुद्धा स्वप्नामध्ये जाऊन तेथे अपूर्व, विशिष्ट पदार्थ पाहतो.  स्वप्नविश्व हे वासनामय विश्व आहे.  म्हणूनच विशेष स्थानामध्ये म्हणजेच जागृतावस्थेत रज्जुसर्प, मृगजळ इत्यादि अनेक पदार्थ जागृत पुरुषाला दिसत असूनही ते मिथ्या, असत् असतात.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्नपुरुषाला दिसणारे दृश्य पदार्थही असत् असतात.

 

जसे जागृतावस्थेत दोरीवर साप दिसतो, वाळूच्या जमिनीवर पाणी दिसते.  यामध्ये साप हा बाहेर कोठे दिसत नसून दोरी या अधिष्ठानामध्येच दिसतो.  पाणी हे जमिनीच्या अधिष्ठानावरच दिसते.  म्हणून येथे अधिष्ठानभूत दोरी किंवा पाणी हेच सत्य असून दिसणारा सर्प व मृगजळ हे मिथ्या आहेत.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये दिसणारे सर्व दृश्य पदार्थ हे स्वप्नाचे अधिष्ठान असणाऱ्या स्वप्नद्रष्ट्याचे - स्थानीचे धर्म आहेत.  अधिष्ठानभूत स्वप्नद्रष्टा हा सत्य असून स्वप्नात दिसणारे सर्व स्वप्नदृश्य पदार्थ मात्र अध्यस्त, भासमान, रज्जुसर्पाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, कल्पित-मिथ्या-असत् स्वरूपाचे आहेत.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ