Tuesday, January 7, 2025

सत्संगाचे प्रयोजन | Necessity Of Satsang

 




सर्वांच्यामध्ये संसारसागर तरून जाण्यासाठी साधुसमागम म्हणजे सत्संग हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे.  याचे कारण मागे सांगितलेले शम, विचार, संतोष ही साधने आत्मसात करण्यासाठी सुद्धा शास्त्राचे श्रवण आवश्यक आहे आणि शास्त्राच्या श्रवणासाठी गुरूंची प्राप्ति म्हणजे सत्संग आवश्यक आहे.  श्रवणाचे संस्कार झाल्याशिवाय शास्त्रविचार, धर्माधर्मविचार होऊ शकत नाही.  विचाराशिवाय मनाची उपशमा होत नाही आणि मनाची उपशमा झाल्याशिवाय तृप्ति सुद्धा प्राप्त होत नाही.  म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम सत्संगाचीच आवश्यकता आहे.  हा पहिला भाग.

 

दुसरा भाग म्हणजे ज्या आत्मवस्तूचे आपल्याला ज्ञान घ्यावयाचे आहे, ती आत्मवस्तु अत्यंत सूक्ष्म असून इंद्रिये, मन, बुद्धीच्याही अतीत आहे.  त्यामुळे केवळ स्वतःच्या बुद्धीने आत्मज्ञान घेता येत नाही.  त्यासाठी गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता असते.  हा दुसरा भाग.

 

यानंतर ज्या बुद्धीने ज्ञान घ्यावयाचे, ती बुद्धि अत्यंत मर्यादित असून ती फक्त दृश्य वस्तूचेच ज्ञान देऊ शकते.  बुद्धीमध्ये रागद्वेषादि दोष असल्यामुळे ती कलुषित आणि मर्यादित असते.  म्हणून आत्मज्ञानाची स्वतःची बुद्धि हे प्रमाण होऊ शकत नाही.  आत्मज्ञान घेण्यासाठी गुरूंनाच शरण गेले पाहिजे.

 

याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर साधकाने जप-तपादि अन्य कितीही साधना केल्या, त्यामुळे चित्ताची शुद्धि झाली, तरी साधकामध्ये अहंकार हा दोष राहतोच.  अन्य सर्व साधनांनी हा दोष कमी न होता उलट वर्धन पावतो.  म्हणून अहंकाराचा नाश करावयाचा असेल तर गुरुसेवेशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.  म्हणून सर्व दैवी गुणांच्यामध्ये आचार्यासेवा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ