"महामारी जरी भयंकर असेल तरी शास्त्रविहित
व धर्मपरायण, सज्जन लोकांचे यामधून रक्षण व्हावे, त्यांना या महामारीची चिकित्सा करता
यावी, महामारीसारख्या भयंकर रोगाचा प्रतिकार करता यावा, म्हणून हा एक मंत्र माझ्याजवळ
आहे. त्या मंत्राचा मी आता उच्चार करतो." असे म्हणून पितामह ब्रह्मदेवांनी हा
मंत्र व त्याचे रहस्य सांगण्यास प्रारंभ केला. "हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला
'कर्कटी' नावाची एक राक्षसी राहत आहे. तिच्या निवारणाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे -
ॐ ह्रींह्रांरींरां विष्णुशक्तये
नमः | ॐ नमो भगवति विष्णुशक्तिमेनां ॐ हरहर नयनय पचपच मथमथ उत्सादय दूरेकुरु स्वाहा
हिमवन्तं गच्छ जीव सः सः सः चन्द्रमन्डलगतोSसि स्वाहा |
असा हा मंत्र भूर्जपत्रावर लिहून रुग्णाच्या
डाव्या तळहातावर ठेवावा व नंतर रुग्णावर पाणी शिंपडावे. मंत्र म्हणत असताना मंत्र
म्हणणाऱ्याने आपल्या मनामध्ये दृढ भावना करावी की, या मंत्ररूपी मुद्गराच्या जोरदार
शास्त्राने कर्कटी राक्षसीचे मर्दन झाले असून ती अत्यंत कर्कश आवाजात हिमालय पर्वताच्या
दिशेने धावत सुटली आहे. जो रुग्ण आहे त्याने चिंतन करावे की, तो अमृताने युक्त
असणाऱ्या चंद्रमंडलात पोहोचला असून त्याच्या हृदयात चंद्रसायन आहे. तो सर्व रोगांच्या
भ्रमापासून मुक्त झाला आहे. साधकाने स्नान करून शुचिर्भूत व्हावे व अत्यंत शांत
व स्थिर चित्ताने आचरण करून क्रमाने सांगितल्याप्रमाणे या सर्व क्रिया कराव्यात. असे
केल्यामुळे निश्चितच तो मंत्र या विषुचिकेचा, या महामारीचा नाश करतो.
हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार करणे नव्हे
! हे सिद्ध मंत्र त्यांच्या शक्तींनी युक्त असतात. त्यामुळे दिलेल्या नियमाप्रमाणेच
मंत्रोच्चार करणे आवश्यक असते आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्रोच्चार करणारा
साधक आणि रुग्ण या दोघांच्याही अंतःकरणात त्या मंत्राबद्दल पूर्ण विश्वास आणि नितांत
श्रद्धा आवश्यक आहे.
मनुष्याला, राष्ट्राला किंबहुना
संपूर्ण विश्वाला महामारीसारख्या सुद्धा दुर्धर संकटामधून मुक्त व्हावयाचे असेल तर
मंत्र, औषधोपचार वगैरेदि अनेक उपाय आहेत. मात्र त्या सर्वांचा योग्य परिणाम व्हावयाचा
असेल तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुण, सदाचार, सात्त्विक वृत्ति, धर्मबुध्दि आवश्यक
आहे. मनुष्य पौर्वात्य असो व पाश्चिमात्य, श्रीमंत असो अथवा गरीब,
सुशिक्षित असो अथवा अशिक्षित, परंतु प्रत्त्येक मनुष्यामध्ये चांगली वृत्ति आवश्यक
आहे. त्याच्यामध्ये माणुसकी, मनुष्यत्व व त्यासाठी आवश्यक असणारे प्रेम, त्याग, निःस्वार्थता,
समर्पण असे सद्गुण आवश्यक आहेत. त्यासाठी मनुष्यामध्ये या भौतिकतेमुळे शिरलेले
पशुत्व नष्ट होणे गरजेचे आहे. मी व माझे ही संकुचित वृत्ति नष्ट होऊन त्याचे मन थोडेसे
विशाल झाले पाहिजे.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–

