हे रामा ! ज्याप्रमाणे प्रचंड मोठ्या मेरू पर्वतावरील एखाद्या
फुलामध्ये एखादी भ्रमरी राहते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या एका रोमाच्या एका
टोकामध्ये ही जगद्रूपी लक्ष्मी निवास करते. असे कोट्यवधि रोम असल्यामुळे अशा कोट्यवधि सृष्टि,
ब्रह्माण्ड ज्ञानी पुरुषामध्ये स्थित असतात. त्याच्या दृष्टीने एक जग नसून अशी कोटी ब्रह्मांडे
त्याच्या हृदयाकाशामध्ये स्थित असतात. हे रामा ! एकेका परमाणूमध्ये हजारो सृष्टि निर्माण होऊन अस्तित्वात
असतात. ज्ञानी पुरुष अशा अनंत सृष्टींना
स्वतःच उत्पन्न करतो, स्वतःमध्ये धारण करतो व स्वतःमध्येच या सृष्टींचा लय करतो. म्हणजे तोच या अनंत कोटी सृष्टींचा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता
होऊन अनंतकोटीब्रह्माण्डनायक होतो. त्या अनंत
कोटी ब्रह्मांडांच्या दृष्टीने ज्ञानी पुरुषासाठी हे दृश्य जग अतिशय छोटे, निकृष्ट,
नगण्य व असत् स्वरूपाचे असते. तो स्वतःच स्वतःमध्ये या अनंतकोटी ब्रह्मांडांना
पाहतो. त्या सर्वांचा साक्षी होतो. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे जग अंशमात्र सुद्धा
नाही.
मी तुला इतकेच सांगू शकतो की, रामा ! ज्ञानी पुरुष अनंतकोटी ब्रह्मांडांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता
तर आहेच ! परंतु रामा ! असे लक्षावधि व अब्जावधि हरिहर एका ज्ञानी पुरुषामध्ये
सामावलेले असतात. एक वेळ एका हरीचे वा
एका हराचे दर्शन सोपे आहे. परंतु ज्याच्यामध्ये
लाखो शिव आणि विष्णु सामावलेले असतात, जो कोट्यवधि सृष्टींना धारण करतो आणि कोट्यवधि
सृष्टींचा निरास करतो, तो एकमेवा द्वितीय असणारा ज्ञानी पुरुष आहे.
हे रामा ! तू माझ्या या विधानाला अतिशयोक्ति समजू नकोस. जीवनमुक्त ज्ञानी पुरुष कोट्यवधि जीवांच्या अंतःकरणामधील
कोट्यवधि संसारांचा या निर्वाण ज्ञानाच्या साहाय्याने निरास करतात. रामा ! तू
कल्पना कर एका शिवाचे दर्शन सुद्धा किती सत्य, शिव व सुंदर असते. असे लाखो शिव एकत्र आले, विश्वाला धारण करणारे जगदाधार
लाखो विष्णु एकत्र आले, ज्ञानाच्या तेजाने तळपणारे लाखो सूर्य एकत्र आले तर त्यांच्या
दर्शनाप्रमाणेच या जीवनमुक्त पुरुषाचे दर्शन आहे. या ज्ञानी पुरुषाला लाखो हरिहरांच्याबरोबर त्यांच्या
लक्षावधि शक्ति सुद्धा मिळाल्यामुळे ज्ञानी पुरुष अत्यंत सामर्थ्यशाली व श्रेष्ठ होतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

