या विश्वामध्ये कोठेच सत्याची प्रचीति
येत नाही. सत्य वस्तु कोठेही दिसत नाही. म्हणून विश्व म्हणजे चित्ताला झालेला भ्रम आहे. जसे एखादे वेळी आपल्या मनाला कोठे भुताचा
भ्रम झाला तर आपल्याला सर्वच ठिकाणी भूते दिसायला लागतात. माणूस समोर आला तरी त्यामध्ये भूत दिसते. परंतु भुताचे अस्तित्व कोठेही नसते. त्या कल्पित भुताप्रमाणेच या जगताचे अस्तित्वही
कल्पित आहे. कारण जगताचे मूळ बीजच अस्तित्वामध्ये
नाही.
विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा पाहिले
तरी - कारणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे विश्वाचे कारणच अस्तित्वामध्ये नसल्यामुळे
विश्वाची वास्तविक निर्मिती होणे शक्य नाही. जसे आपणास दोरीवर सर्पाचा भास झाला, तरी सर्पाची
प्रत्यक्ष निर्मिती झाली असे म्हणता येत नाही. कारण दोरीवर भासणारा सर्प कोणत्याही अंड्यामधून निर्माण
झाला नाही. म्हणूनच ती भासात्मक निर्मिती आहे.
त्या सर्पाचे कारण जसे मिथ्या तसेच विश्वाचे
कारणही मिथ्या असून विश्व सुद्धा मिथ्या आहे. कारण विश्व हे निर्बीज आहे.
तसेच हे रामा ! तुला मी खरे सांगतो की, या स्वप्न व चित्राप्रमाणे
असणाऱ्या मिथ्या संसाराने कोणीही दुःखी होत नाही. या जगात वास्तविक स्वरूपाने दुःख अस्तित्वातच नाही.
म्हणून तरी संसाराचे हे मिथ्यास्वरूप जाणून
ज्ञानी पुरुष कधीही दुःखी होत नाही. अज्ञानी
मनुष्य दुःखी दिसत असेल तरी त्याचे दुःख स्वप्नातील दुःखाप्रमाणे मिथ्या आहे. किंवा चित्रामध्ये दिसणाऱ्या दुःखी माणसाचे दुःख
जसे मिथ्या असते, तसेच संसारी मनुष्याचे दुःखही मिथ्याच असते. हे विवेकाने जाणावे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–