Tuesday, August 27, 2024

कपिन्याय आणि मार्जारन्याय | Monkey And Cat Method

 




भगवान ज्ञानी आणि अनन्य भक्त यांच्यामधील भेद सांगतात.  शास्त्रामध्ये दोन प्रकारचे न्याय सांगितले जातात.  १) कपिन्याय, २) मार्जारन्याय.  व्यवहारामध्ये कपि म्हणजे माकड आणि मांजराचे निरीक्षण केले तर आपल्याला दोन भिन्न प्रवृत्ति दिसतात.  माकड इकडून तिकडे उड्या मारीत असताना आपल्या पिलाला धरत नाही तर पिल्लुच माकडाला धरते.  माकड त्याला सांगते की, तूच मला घट्ट पकड.  मी तुला पकडणार नाही.  मी इकडून तिकडे उड्या मारेन.  तुला इकडून तिकडे नेईन.  परंतु तुझा हात सुटून तू पडलास तर माझा नाईलाज आहे.  मी काहीही करू शकत नाही.  तू तुझ्या कर्तृत्वाने माझ्याबरोबर ये.  त्याचप्रमाणे निर्गुण उपासक, जिज्ञासु साधक सर्व कर्तृत्व स्वतःकडे घेतो.  मी स्वतः “श्रवण-मननादि” साधना करेन.  क्रमाक्रमाने परमेश्वरस्वरूप प्राप्त करेन, अशी त्याची वृत्ति असते.  मग परमेश्वर सुद्धा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करीत नाही.

 

परंतु, याउलट मार्जारन्यायामध्ये मात्र मांजराचे पिल्लू अत्यंत केविलवाणे, असाहाय्य, अगतिक असते.  मला काहीही करता येत नाही.  माझ्यामध्ये कोणतेही सामर्थ्य नाही, असे म्हणून आपली सर्व जबाबदारी ते मांजरावर टाकते आणि ते स्वतः शांत राहाते.  त्यामुळे मांजर स्वतःच आपल्या पिल्लाची रात्रंदिवस काळजी घेते.  त्याचे सर्व प्रकारे रक्षण करते.  जरा कोठे धोका दिसला की, पिल्लाला आपल्या तोंडामध्ये अलगद धरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेते.  मांजरीचे दात पिल्लाला लागत नाहीत.  अशा प्रकारे ते पिल्लू पूर्णतः मांजरीच्या अधीन, आश्रित असते.

 

याचप्रमाणे, परमेश्वराचा भक्तही म्हणतो, हे भगवन् !  तू सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आहेस.  तूच सर्वांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता, रक्षणकर्ता असून विश्वंभर आहेस.  तूच सर्वांना सत्ता, स्फूर्ति, शक्ति देऊन सर्वांचे पोषण, वर्धन, रक्षणही करतोस.  तुझ्या केवळ अस्तित्वामुळेच सर्व जीवांना, या चराचर सृष्टीला चेतना प्राप्त होते.  तुझ्या शक्तीच्या एका अंशाने मी जगतो.  म्हणूनच मी माझा सर्व भार तुझ्या चरणी वाहिला आहे.  असे असेल तर मग उगीचच मी माझ्या उद्धाराची काळजी कशाला करू ?  मला फक्त तुझ्यावर प्रेम करता येते.  मी तुला पूर्ण भावाने शरण आलो आहे.  तेव्हा माझी सर्व काळजी तुला घेतली पाहिजे.  नव्हे, नव्हे तुझे ते कर्तव्यच आहे.  तुझे ब्रीद आहे –

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते |

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||                               (गीता अ. ९-२२)

माझ्या अनन्य भक्तांचा योगक्षेम मी – परमेश्वर चालवितो.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ