Tuesday, August 20, 2024

विचाराचा आश्रय | Refuge Of Thinking

 



राघवा !  ज्याप्रमाणे एखाद्या राज्यामध्ये संकट निर्माण झाले तर तो राजा आपल्या विश्वासु मंत्र्यांना बोलावतो.  त्यांच्याशी विचारविनिमय व चर्चा करतो.  त्या संकटामधून कसे मुक्त व्हावे ?  त्यासाठी कोणता उपाय आहे ?  तसेच कोणता उपाय सफल होईल ?  आणि कोणता उपाय निष्फळ ठरेल ?  याचा निर्णय विचारानेच घेतला जातो.  कोणताही राजा शत्रूचे आक्रमण झाल्यानंतर अविचाराने लगेचच तलवार हातात घेत नाही.  आपली नीति काय ठरवायची, आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, हे निर्णय विचारांतीच घेतले जातात.

 

म्हणून राज्य असेल, राष्ट्र असेल, देश असेल, समाज, कुटुंब किंवा स्वतःचे व्यक्तिगत जीवन असेल, या सर्व ठिकाणी कोणतीही समस्या सोडवायची असेल तर सर्वप्रथम विचारच आवश्यक आहे.  मनुष्य एकदम उतावीळ झाला तर अविचाराने शोकमोहग्रस्त होतो आणि अशा अवस्थेमध्ये घेतलेला निर्णय पुष्कळ वेळेला चुकीचा ठरून तो दुःखाला कारण होतो.  विचार करण्यापूर्वीच त्या प्रसंगामध्ये मनामधील रागद्वेष किंवा कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर आले तर मनुष्य निरपेक्षपणाने निर्णय घेऊ शकत नाही.  म्हणून राजापासून ते सामान्य मनुष्यापर्यंत कार्याची योजना ठरविण्यासाठी विचार हेच उत्तम साधन आहे.  हे रामा !  याप्रकारे व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी जर विचार आवश्यक असेल, तर अध्यात्ममार्गामध्येही विचार पाहिजेच !

 

ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी गडद अंधारात काही पाहायचे असेल तर दीप अत्यंत आवश्यक आहे.  दिव्याच्या प्रकाशामध्ये वस्तु स्पष्ट दिसतात.  म्हणून अंधारामध्ये वस्तु चाचपडत बसण्यापेक्षा दीप प्रज्वलित करावा आणि वस्तु पाहावी.  कारण अंधारात चाचपडून, प्रयत्न करूनही वस्तु तर मिळत नाहीच, उलट आपला तोल जाऊन आपल्याला कोठेतरी इजा होते.  त्याचप्रमाणे रामा !  साधकाने क्षणाक्षणाला या विचाराचा आश्रय घ्यावा.  वेद, वेदांत, सिद्धांत या सगळ्यांचा निर्णय करताना बुद्धीने आत्मविचार करणे आवश्यक आहे.  याचा अर्थच वेदांतशास्त्राचे श्रावण-मनन-निदिध्यासना, तसेच ध्यान, कर्म, योग अशा कोणत्याही साधना करीत असताना त्यामध्ये विचाराचे सामर्थ्य पाहिजे.  विचार करताना बुद्धि सुसंस्कृत हवी आणि त्या बुद्धिवर सत्संगाचे व शास्त्रश्रवणाचे संस्कार हवेत.  अशी शुद्ध, सूक्ष्म व अंतर्मुख झालेली बुद्धि श्रुति आणि युक्तीच्या साहाय्याने शास्त्रविचार करू शकेल.  ती बुद्धि आत्मविचारामध्ये तल्लीन, तन्मय व तद्रूप होईल.  म्हणून साधकाने विचाररूपी दीपाच्या साहाय्याने आत्मानात्मविवेक करावा.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ