Tuesday, August 13, 2024

गुरूंचे स्थान सर्वोच्च | Guru Is Supreme

 



साधकाच्या जीवनामध्ये गुरु हेच अंतिम आश्रयस्थान आहे.  गुरु हीच श्रद्धा, निष्ठा आणि साधना आहे.  शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुभाव निर्माण होणे आवश्यक आहे.  गुरुभाव म्हणजेच शरणागतीचा, प्रेमाचा, नम्रतेचा, विनयशीलतेचा उत्स्फूर्त असणारा अंतःस्फूर्त भाव होय.  “गुरु हेच माझे सर्वस्व आहे, गुरूच मला या भवसागरामधून तारून नेतील”,  या भावामध्येच साधकाचा अहंकार गुरूंच्या चरणी पूर्णतः नतमस्तक होतो.  तो रक्षणासाठी गुरूंना आर्ततेने प्रार्थना करतो.

 

त्यावेळी गुरु शिष्यावर अनुग्रह करतात.  कृपा आणि करुणा करतात.  ते शिष्याला जसा आहे तसा प्रथम मान्य (accept) करतात.  विश्वामध्ये अन्य सर्व माणसे आपल्यामधील जेवढा भाग त्यांना आवडतो, तेवढाच मान्य करतात.  बाकी सर्व अमान्य (reject) करतात.  परंतु गुरु हे एकच स्थान असे आहे की, ते शिष्याला त्याच्या गुणदोषांच्यासहित मान्य करतात.  तेच शिष्याला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन करतात.  भगवान म्हणतात –

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः |  नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता || (गीता अ. १०-११)

माझ्या अनन्य भक्तांच्यावर कृपा करण्यासाठीच मी परमात्मा गुरुस्वरूपाने अवतीर्ण होऊन शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञानरूपी अंधकाराचा ज्ञानरूपी प्रकाशाने ध्वंस करतो.

 

शास्त्रकार सांगतात –

दुर्लभो विषयत्यागः दुर्लभं तत्त्वदर्शनं |  दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना ||

गुरूंच्या कृपेशिवाय विषयांचा त्याग, तत्त्वाचे दर्शन आणि पारमार्थिक ज्ञानाची सहजावस्था प्राप्त होणे दुर्लभ आहे.  किंवा भगवान नारदमहर्षि म्हणतात – महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा | (नारदभक्तिसूत्र)

हे ज्ञान महात्म्यांच्या आणि भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते.  म्हणून संत कबीर सुद्धा म्हणतात –

गुरु गोविंद दोनु खडे काके लागू पाव |

बलिहारी गुरु मेरे जिनो गोविंद दियो बताय ||      (संत कबीर)

माझ्या समोर एकाच वेळी गुरु आणि परमेश्वर उभे राहिले, तर मी प्रथम गुरुंनाच नमस्कार करेन, कारण परमेश्वर कोठा आहे, कसा आहे ?  मला माहित नाही.  तो माझ्याशी बोलतही नाही.  परंतु गुरु मात्र मला या परमेश्वराचे स्वरूप दाखवितात.  माझ्या जीवनाला योग्य दिशा देतात.  म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ