वसिष्ठ रामायणामध्ये एक सुंदर कथा आहे. कुलगुरू वसिष्ठ प्रभू श्रीरामांच्या राजदरबारामध्ये
रोज प्रबोधन करण्यासाठी येत असत. रोज – ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या | असा उपदेश करीत. रोज तोच तोच उपदेश ऐकून श्रीरामाला कंटाळा येतो.
एक दिवस प्रभू श्रीराम आपल्याच गुरूंच्या
ज्ञानाची परीक्षा पाहण्याचे ठरवितात. त्याप्रमाणे
नियोजन करतात. एक दिवस वसिष्ठ मुनी ज्या
मार्गाने राजदरबारामध्ये येत, त्या मार्गाने त्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती सोडला जातो. तो हत्ती पाहताच वसिष्ठ मुनी घाबरतात. जीव मुठीत धरून पाळतात आणि धापा टाकीत राजदरबारामध्ये
प्रवेश करतात. त्यांना तसे पाहून श्रीराम
त्यांच्या घाबरण्याचे व पळण्याचे कारण विचारतात. वसिष्ठ मुनी घडलेला वृत्तांत प्रभू श्रीरामाला
कथन करतात. यावर श्रीराम वसिष्ठ मुनींनाच
शंका विचारतात की, “अहो ! तुम्ही जर
मला रोज उपदेश करता की, हे सर्व मिथ्या आहे. असे असताना मिथ्या असणाऱ्या हत्तीला तुम्ही कसे काय घाबरलात ?”
हा प्रश्न ऐकल्याबरोबर वसिष्ठ मुनींना जे
समजायचे ते समजते. रामाला वाटत असते की,
हे सगळे शाब्दिक ज्ञान आहे. परंतु वसिष्ठ
मुनी रामाला उपदेश देतात – “अरे बाळा ! हे
श्रीरामा ! मी जे ज्ञान तुला सांगितले, ते
तू अर्धवट ऐकलेस. हे सर्व मिथ्याच आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे हत्ती मिथ्या आहे, हत्तीचे धावणे, माहूत, इतकेच नव्हे, तर मिथ्या हत्तीला घाबरलेला वसिष्ठही तितकाच मिथ्या आहे. त्याचे घाबरणेही मिथ्या आहे आणि त्याहीपेक्षा मिथ्या हत्तीला, मिथ्या गुरूंच्यावर सोडणारा राम सुद्धा तितकाच मिथ्यास्वरूप आहे.”
याठिकाणीच कथा संपते. या कथेमधून फार मोठे तत्त्व
सांगितलेले आहे. शास्त्र
समजणे, शास्त्राची दृष्टि समजणे खरोखरच फार अवघड आहे. शास्त्र समजण्यासाठी तितकेच परिपक्व मन हवे. सर्वच ब्रह्मस्वरूप आहे आणि सर्वच मिथ्या
आहे, ही दोन्हीही वाक्ये एकाच अधिकरणामध्ये वापरली जातात. फक्त एकाचा बाध केलेला आहे आणि एकाची सत्ता सिद्ध केलेली आहे. विश्वाचा बाध केला आणि त्याच ठिकाणी त्याच
अधिकरणामध्ये ब्रह्मस्वरूपाची सिद्धि केली. ब्रह्म हेच पारमार्थिक सत्य आहे. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व मिथ्या, अनृत आहे.
- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- हरी ॐ–