Tuesday, June 4, 2024

सर्वश्रेष्ठ यज्ञ – जपयज्ञ | Most Superior – ‘Japa’ Offering

 



कोणतेही वैदिक, यज्ञयागादि कर्म करताना त्याच्या पूर्णतेसाठी अनेक घटक आवश्यक आहेत.  यजमान, पुरोहित, वेदमंत्र, हवनसामग्री, हवनासाठी आवश्यक साधने, अग्निकुंड, स्थान, देश, काल वगैरे हे सर्व घटक एकत्र झाल्यानंतरच यज्ञाची यथासांग पूर्णता होते.  परंतु त्यामध्ये असे अनेक घटक आहेत की, ते मनुष्याच्या हातामध्ये नाहीत.  अनेक त्रुटीमुळे प्रत्यवाय दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.  त्यामुळे इष्टफळ प्राप्त होण्याऐवजी प्रत्यवाय दोषांच्यामुळे अनिष्ट फळ मिळण्याची शक्यता अधिक असते.  अशा सर्व यज्ञांच्यामध्ये जपयज्ञ अधिक श्रेष्ठ आहे.  याचे कारण –

१) याठिकाणी जप हा यज्ञ आहे असे म्हटले तरीही तो प्रत्यक्ष बाह्य यज्ञाप्रमाणे कर्मप्रधान यज्ञ नाही.  त्याला कोणत्याही प्रकारची सामग्री आणि अन्य साधन, देश, काल, वगैरेची कशाचीही जरुरी नाही.  यामुळे अन्य यज्ञामध्ये येणाऱ्या त्रुटि आणि प्रत्यवाय दोषांचा प्रश्नच उद्भवत नाही.

२) जपयज्ञामध्ये शरीर आणि इंद्रियांचे सर्व व्यापार शांत होतात.  म्हणजेच इंद्रियांची पूर्णतः उपशमा होते.

३) तसेच जपयज्ञ हा पूर्णतः मानसिक व्यापार आहे.  यामध्ये एकाच प्रकारच्या मंत्राची पुन्हा पुन्हा आवृत्ति केली जाते.

४) यामुळे कोणताही प्रयत्न न करता सहजपणे मन बाह्य विषयांच्यापासून निवृत्त होऊन अंतर्मुख होते.  जितक्या प्रमाणामध्ये मन जपउपासनेमध्ये एकरूप होईल तितक्या प्रमाणामध्ये मनाची एकाग्रता, तल्लीनता, तन्मयता वाढते.  एकाच मंत्राची आवृत्ति असल्यामुळे मनाची चंचलता, मनाचे भरकटणे आपोआपच संपते आणि मनाची वृत्ति स्थिर होते.  तसेच विषयचिंतनाच्या अनुषंगाने निर्माण होणारे राग-द्वेष, कामक्रोधादि विकार यांचा प्रभाव कमी कमी होतो.  मन संकल्प-विकल्परहित होऊन अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि शांत होते.  मनामधील विक्षेप आणि द्वन्द्व कमी होतात.  अशा मनामध्ये दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष होतो.  इतकेच नव्हे तर हाच जप साधकाला ध्यानावस्थेपर्यंत नेतो.  या सर्व करणासाठी इतर यज्ञांच्यापेक्षा जपयज्ञ अत्यंत श्रेष्ठ साधना आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ