Monday, May 13, 2024

ब्रह्माजींचे स्वप्न | The Dream Of Brahmaji

 




ज्याप्रमाणे आकाशामध्ये अनेक आकार भासतात किंवा मनाने कल्पना करून एखाद्या मनुष्याची आकृती दिसते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा देह सुद्धा भासमान होतो.  परंतु ब्रह्मदेवाचा देह भासत असला तरी तो वस्तुतः निर्माण झालेला नसून तो पृथ्व्यादि पंचमहाभूतांनी रहित असतो.  म्हणजेच पृथ्वी वगैरेदि पंचमहाभूतांचा काहीच संबंध नसूनही केवळ संकल्पाने ब्रह्मदेवाचा आकार भासमान होतो.

 

हे दृश्य विश्व म्हणजे आकाशामधून जणु काही स्फुरण पावलेले विविध आकार आहेत.  ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मनामध्ये अनेक संकल्प करतो.  त्याला अनेक कल्पना स्फुरतात आणि तो त्या कल्पनांच्यामधून सृष्टि निर्माण करतो.  प्रत्येक मनुष्य आपल्या मनामध्ये स्वतःचे असे मनोविश्व निर्माण करतो.  तो स्वतःच त्या विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता होतो.  असा तो मनुष्य जणु काही त्याच्या मनोसृष्टीचा ब्रह्मदेव असतो.

 

मग एक सामान्य मनुष्य कल्पनेमधून सृष्टि निर्माण करीत असेल तर ब्रह्माजीच्या कल्पनेमधून ही सृष्टि निर्माण होते, यात काय आश्चर्य ?  मनोविश्व तयार करीत असताना मनुष्य जणु काही स्वयंभू ब्रह्माजीसारखा दिसतो.  हा जीव कल्पना रंगवून जशी आपली एक सृष्टि तयार करतो, तशीच ब्रह्मदेवाने ही सृष्टि अत्यंत निर्मल अशा मायारहित, निर्गुण, निर्विशेष आकाशात केली आहे.

 

आकाशात अचानक मोत्यांचा हार दिसावा, इतक्या सहजतेने या सृष्टीची निर्मिती झाली आहे.  किंवा आपल्या कल्पनेमध्ये, स्वप्नामध्ये एखादी नगरी दिसावी, त्याचप्रमाणे पृथ्व्यादि पंचमहाभूते आणि ब्रह्मदेवाचा आकार या विश्वात निर्माण झाला.  थोडक्यात, हे दिसणारे विश्व आणि आपण स्वतः सुद्धा सर्व ब्रह्माजीची कल्पना आहे.  किंवा ब्रह्माजीला पडलेले स्वप्न म्हणजेच ही सृष्टि आहे.  ही सृष्टि स्वप्नवत् असून केवळ संकल्पामधून निर्माण झाली आहे.  त्यामुळे ही सृष्टि ब्रह्माजीने निर्माण करताना बाहेरून कोणतीही सामग्री आणली नाही.  फक्त संकल्प केला - सोSकामयत |  आणि तो बहुरूपाला प्राप्त झाला.  ही सृष्टि म्हणजे ब्रह्माजीचा केवळ संकल्प किंवा स्वप्न आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ