Tuesday, September 5, 2023

मनुष्य शरीराचा 'रथ' | The 'Chariot' of Human Body

 



वसिष्ठ मुनि रथाचा दृष्टांत देतात.  रथ जसा जड, अचेतन असतो तसेच आपले शरीरही रथाप्रमाणे अचेतन आहे आणि या शरीररूपी रथामध्ये बसलेला रथस्वामी म्हणजे जीवात्मा आहे.  या शरीररूपी रथाला पाच ज्ञानेंदिये व पाच कर्मेंद्रिये असे घोडे जोडले आहेत.  असा हा रथ सज्ज होऊन त्याच्यामध्ये रथस्वामी बसला की, तो रथ मार्गक्रमण करू लागतो.  हे मार्ग म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि दृश्य विषय आहेत.  या विषयरूपी मार्गांच्यामधून जात असताना इंद्रियरूपी घोड्यांच्यावर नियमन करण्यासाठी रथस्वामीच्या जवळ मनरूपी लगाम आहे.  म्हणजे मनानेच इंद्रियांच्यावर निग्रह केला पाहिजे.  याप्रमाणे शरीररूपी रथ या संपूर्ण विश्वामध्ये परिभ्रमण करीत असतो.

 

ज्ञानी पुरुष ज्यावेळी या रथाकडे पाहतो, त्यावेळी त्याला निश्चितपणे माहीत असते की, रथ हा माझ्यापासून नित्य भिन्न आहे.  जाण्यायेण्याचे फक्त ते साधन आहे.  'मी' मात्र त्या रथापासून भिन्न असणारा परमात्मस्वरूप आहे.  'मी' परमात्मा त्या रथस्थ पुरुषापासून म्हणजेच जीवाच्या सुद्धा अतीत आहे.  इतकेच नव्हे, तर तो रथस्थ पुरुष आणि मी खरे तर एकच आहोत.  जीव हा जीव नसून जीव स्वतःच परमात्मस्वरूप आहे.  केवळ शरीर, बुद्धि या उपाधीच्या अनुषंगाने त्याला 'जीव' असे म्हटले जाते.  परंतु उपाधीचा निरास केला तर रथही नाही, घोडे, लगाम, रस्तेही नाहीत व रथस्वामी सुद्धा नाही.  केवळ परमात्मस्वरूप हेच सत्य आहे.  म्हणजेच शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान ही सर्व उपाधि काल्पनिक, मिथ्या स्वरूपाची असून, 'मी' परमात्मा मात्र या सर्वांच्याही अतीत आहे.

 

आत्मस्वरूपाचे असे यथार्थ ज्ञान ज्या ज्ञानी पुरुषाला होते, त्याचे या जगात राहणे म्हणजे आनंदाने पर्यटन करणे आहे.  ज्ञानी पुरुष तत्त्वाची दृष्टि प्राप्त झाल्यामुळे अत्यंत स्थिर, शांत व प्रसन्न मनाने राहतो.  याचे कारण त्याच्या दृष्टीने हा दृश्य संसार, सर्व प्रसंग, सर्व दुःखे मिथ्या व कल्पित स्वरूपाची आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ