Tuesday, August 15, 2023

भक्तीचे साधन ज्ञान आहे | Knowledge - The Means Of Devotion

 



ज्यावेळी एखाद्या वास्तूचे गुण, धर्म, माहात्म्य, सौंदर्य, उपयोगिता वगैरे संपूर्ण अज्ञात असते त्यावेळी अशा अज्ञात वस्तूवर किंवा व्यक्तीवर कोणताही मनुष्य प्रेम करू शकत नाही.  ती वस्तु प्राप्त करावी ही इच्छा सुद्धा उत्पन्न होत नाही.  म्हणून व्यवहारामध्ये आपल्याला जेव्हा वस्तूचे गुण, धर्म, महत्व, उपयोगिता वगैरेंचे प्रत्यक्ष ज्ञान होते तसे आपले मन त्या वस्तूकडे आकर्षित होते.  जरी ती वस्तु आपण प्रत्यक्ष बघितली नसली तरी तिच्या गुणश्रवणाने त्या वस्तूकडे आकर्षित होतो.  कळत नकळत त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होते.  अनेक लोकांच्याकडून त्या वस्तूचा गुणगौरव ऐकतो तितके त्याचे महत्व अधिक वाटावयास लागते.  ओढ निर्माण होते. वस्तु हवीहवीशी वाटू लागते.  ती वस्तु प्रिय वाटते.  स्नेह वाढतो.  हे व्यवहारात बघतो.

 

त्याचप्रमाणे परमेश्वर पूर्णतः अज्ञात आहे.  तो कसा आहे ?  कोठे आहे ?  त्याचे स्वरूप, कार्य, ऐश्वर्य काहीही माहीत नाही.  अशा पूर्ण अज्ञात परमेश्वरावर परमप्रेमरूप भक्ति करणे अशक्यप्राय आहे.  जो परमेश्वर पूर्ण अज्ञात आहे, त्याविषयी मनुष्याच्या मनात भक्तीची उदात्त वृत्ति कशी निर्माण होणार ?  हे कधीही शक्य नाही.  म्हणून काही आचार्य म्हणतात की, अशा प्रकारची भक्ति निर्माण होण्यासाठी, भक्तीचा उदात्त भाव निर्माण होण्यासाठी भक्ताला, साधकाला, ईश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  नवविधा भक्तीमध्येही पहिली 'श्रवणभक्ति' आहे.

 

श्रवणामधून ईश्वराचा महिमा, माहात्म्य, विभूति तसेच अनेक अंगांचे ज्ञान होते.  सौंदर्य, माधुर्य, परमेश्वराचे भक्तवात्सल्य, करुणास्वरूप, भक्तांचा रक्षणकर्ता, उद्धारकर्ता, तसेच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, विश्वाचा नियामक, उत्पत्तिस्थितिलयकर्ता वगैरे स्वरूप श्रवण केल्यामुळे परमेश्वराच्या सत्तेची जाणीव होते.  कळत नकळत मनात श्रद्धा निर्माण होते.  प्रेम निर्माण होते.  त्याच्या कथा, कल्याणगुण ऐकत असताना मनामध्ये भक्तीचा भाव उत्कर्षित होऊन, मन तल्लीन होते.  मन अत्यंत शुद्ध होते.  मनाला शुद्ध, निर्विषयक आनंदाची अनुभूति येते.  त्यामुळे मन परमेश्वराकडे अधिकाधिक ओढ घेऊ लागते.  याप्रकारे प्रेमाचा उत्कर्ष होतो.  म्हणून भक्ताला ईश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  भक्तीचा उत्कर्ष होण्यासाठी ज्ञान हे साधन होते.  भक्तिरूपी फळ ही त्याची पूर्णता आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ