साधुसंतांनी मार्गदर्शन केलेल्या मार्गाने
काया-वाचा-मनाने जे कर्म केले जाते तेच खऱ्या अर्थाने पुरुषप्रयत्न असून त्याचेच
योग्य फळ आपणास मिळते. त्याव्यतिरिक्त
उन्मत्तपणे केलेले कर्म निष्फळ, व्यर्थ ठरते.
वसिष्ठ मुनि पुरुषप्रयत्नांची आणखी एक सुंदर
व्याख्या करतात. प्रयत्न म्हणजे केवळ आपले
मन मानेल तसे कर्म करणे नव्हे. कर्म
करतानाही कोणते कर्म करावे व कोणते करू नये, याचे सुद्धा शास्त्र आहे. साधु-संतांनी
उपदिष्ट केलेल्या कर्माचेच अनुसरण करावे. आपल्या
जीवनामध्ये सत्संगाला अतिशय महत्त्व आहे. जीवनात
एक वेळ पैसा, संपत्ति
अन्य सर्वकाही मिळेल, परंतु
सत्संग मात्र दुर्मिळ आहे. सत्संगामुळे
आपल्या विचारांना आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून मनाने सत्संगामध्ये, संतांच्या संगामध्ये जावे. संत याचा अर्थच - सन्मार्गस्थः संतः | जो स्वतः काया-वाचा-मनसा सन्मार्गाचा, सदाचाराचे, श्रेष्ठ
आचारधर्मांचे पालन करतो, तो
साधु पुरुष असून तोच अन्य लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे अशा सत्संगानेच आपल्या जीवनामध्ये
अंतर्बाहय बदल होतो.
आदि शंकराचार्य सांगतात - नेयं सज्जनसंगे
चित्तम् | साधूंच्या संगामध्ये गेल्यावर
आपोआपच त्याच्या उपदेशाचे संस्कार मनावर होतात. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल होतात आणि
विचार बदलले की आपले आचरणही बदलते. याप्रकारे सत्संगामुळे आचार, विचार, उच्चार उदात्त होऊन साधक सत्कर्मनिष्ठ होऊन धर्मपरायण होतो. अशा वेळी आपल्या हातून चांगलेच कर्म घडते. अशा सदाचारालाच खऱ्या अर्थाने 'प्रयत्न' असे म्हटले जाते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–