कोणत्याही मनुष्याने कर्म केले की त्याचे फळ
हे मिळतेच. क्रिया केली की त्याचा परिणाम
दिसतो. म्हणजेच कर्म केले की, त्याचे फळ निश्चित आहे. काही कर्मांची फळे लगेच मिळतात तर काही फळे काही
काळानंतर मिळतात, तर काही कर्मांची फळे
कदाचित पुढील जन्मामध्येही मिळतात. परंतु
या विषयामध्ये मंदबुद्धीचे लोक विचार करीत नाहीत. त्यामुळेच मोहित झालेले हे अज्ञानी लोक दैवाची
कल्पना करतात. परंतु हे रामा ! दैव हे
वस्तुतः अस्तित्वातच नसून ती मंदबुद्धि लोकांनी केलेली कल्पना आहे. अज्ञानी लोक जीवनामध्ये किंवा रोजच्या
व्यवहारामध्ये सुद्धा सतत दैव हा शब्द वापरतात. त्यांच्या मनात दैव आणि प्रयत्न या शब्दांविषयीच
गोंधळ असतो. ज्यावेळी मनुष्याच्या
शरीराला, इंद्रियांना, बुद्धीला मर्यादा येतात त्यावेळी मनुष्य सोयीस्कर दैव हा
शब्द वापरतो.
काही वेळेस मोक्षाला सुद्धा दैवाच्या पक्षात
टाकतो. "माझ्या दैवात असेल तर मुक्ति
मिळेल, माझ्या नशिबात संसारच लिहिला
आहे." अशी विधाने करून साधक साधनेचा
त्याग करतो. निरुत्साही बनतो. हे अत्यंत
अयोग्य आहे. ऐहिक-पारलौकिक
उपभोग असोत किंवा मोक्ष असो, यापैकी
काहीही मिळवायचे असेल तरी मनुष्याने प्रयत्न हा केलाच पाहिजे. कारण विश्वामध्ये दैव नावाची कोणतीही अज्ञात
वस्तु अस्तित्वात नाही. शेवटी दैव, दैव म्हणजे तरी काय ? याचा विचार केला, दैवाचा शोध घेतला तर समजते की, पूर्वी भूतकाळात केलेला प्रयत्न - पुरुषार्थ म्हणजेच दैव
होय.
ईश्वर किंवा गुरु आपल्याला दैव देत नाहीत
किंवा दैवामध्ये बदलही करीत नाहीत. तर
सर्व संत दैवाला सामोरे जाण्यासाठी सर्वांना उपदेश देतात. उपदेश भूतकाळासाठी किंवा
भविष्यकाळासाठी दिला जात नाही. तर शास्त्र, गुरु, संत हे
मनुष्याला वर्तमानकाळासाठी उपदेश देतात. याचे कारण भूतकाळ तर निघून गेलेला आहे. भविष्यकाळ अज्ञात आहे. उद्या मी जिवंत आहे की नाही याची सुद्धा शाश्वती
नाही. साधना भविष्यकाळात करता येत नाही. तर जे काही चांगले करायचे आहे, त्यासाठी आपल्या हातात फक्त वर्तमानक्षण उपलब्ध आहे. तोही क्षण आला-आला म्हणेपर्यंत भूतकाळामध्ये
निघून जातो. म्हणून पुरुषप्रयत्न हा फक्त
वर्तमानकाळातच करता येतो, हे
स्पष्ट होते. श्री वसिष्ठ मुनि येथे
सांगतात की, अज्ञानी लोक दैवाची कल्पना
करतात. परंतु भूतकाळच काल्पनिक असल्यामुळे
भूतकाळातले दैवही काल्पनिक आहे. म्हणून
मोक्षप्राप्ति जरी करायची असेल तरी प्रयत्न आवश्यक आहेत.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–