Tuesday, January 18, 2022

ब्रह्मलोकाची मर्यादा | Limitation of Heaven



 

शास्त्रामध्ये ऊर्ध्व भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम् हे सात ऊर्ध्व लोक सांगितलेले आहेत.  ब्रह्मलोक किंवा सत्यलोक हा सर्व लोकांच्यामध्ये अत्यंत ऊर्ध्व लोक आहे.  त्या ब्रह्मलोकापर्यंत जाणाऱ्या सर्व जीवांना पुनर्जन्म प्राप्त होतो.  सर्व जीव पुन्हा मर्त्यलोकामध्ये शरीर धारण करतात.

 

१) हे सर्व ऊर्ध्व लोक मर्त्यलोकामध्ये जीवाने अनुष्ठान केलेल्या यज्ञयागादि पुण्यकर्मांनी आणि देवता उपासनेने निर्माण झालेल्या पुण्यसंचयाने प्राप्त होतात.  ज्या प्रमाणामध्ये कर्म आणि उपासना अधिक होते त्या प्रमाणामध्ये ऊर्ध्व-ऊर्ध्व लोक प्राप्त होतात.  म्हणजेच सर्व ऊर्ध्व लोकांची प्राप्ति ही कर्मजन्य आहे.  त्यामुळे जोपर्यंत पुण्यसंचय आहे तोपर्यंतच जीव त्या लोकामध्ये राहू शकतो.  परंतु पुण्यसंचय संपला की, आपोआपच जीव मर्त्यलोकामध्ये परत येतो.  जसे कारण तसे कार्य असते, या न्यायाने – यत् कृतकम् तत् अनित्यम् |  कर्माने जे जे प्राप्त होते ते सर्व अशाश्वत, अनित्य असते.

 

२) ब्रह्मलोक जरी सर्व लोकांच्यामध्ये ऊर्ध्व असेल तरीही इतर ऊर्ध्वलोकांप्रमाणे विश्वामध्ये निर्माण झालेला आहे.  म्हणून तो कार्य आहे.  जे कार्य आहे ते काळाने बद्ध असल्यामुळे अनित्य, नाशवान असते, याच नियमाने ब्रह्मलोकही शाश्वत नसून अनित्य आहे.

 

३) ब्रह्मलोक इतर लोकांप्रमाणे मायाकार्य आहे.  त्यामुळे ब्रह्मलोकासहित सर्व ऊर्ध्व लोक सुद्धा मिथ्या स्वरूपाचे, कल्पित लोक आहेत.  म्हणून स्वतःच्या पुरुषार्थाने कर्मानुष्ठान व देवता-उपासना करून हा जीव ब्रह्मलोकापर्यंत गेला तरीही तो मायेच्याच अधीन आहे.  मर्त्यलोकाच्या तुलनेने ब्रह्मलोक अत्यंत ऊर्ध्व असेल तरी पारमार्थिक दृष्टिकोनामधून तो मायांतर्गत म्हणजेच संसारांतर्गतच आहे.  म्हणून ब्रह्मलोकप्राप्ति मोक्षदायक नसून पुन्हा पुन्हा संसारचक्रामध्येच अडकवणारी आहे.

 

या सर्व कारणामुळे भगवान येथे स्पष्ट करतात की, हे सर्व जीव त्या त्या देवतांच्या ऊर्ध्वलोकाला जातात.  परंतु ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये उर्ध्वलोकामध्ये जाऊन उपभोग घेण्याचीच वासना असते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ