Sunday, December 26, 2021

चिंतनाचे महत्त्व | Importance of Mental Reflection

 



सर्व साधक वर्षानुवर्षे शास्त्राचे श्रवण करतात.  तरीही ही जीवनमुक्तावस्था सर्वांना का बरे प्राप्त होत नाही ?  यावर विचार केला तर समजते की साधकाने शास्त्रश्रवण केले तरी त्यावर पाहिजे तसे चिंतन होत नाही.  श्रवणानंतर मनन व निदिध्यासना या साधना क्रमाने सांगितलेल्या आहेत.  श्रवणामधून शास्त्राचे ज्ञान होते.  मननामधून शास्त्रामधील शंका निरसन होतात आणि चिंतन किंवा निदिध्यासनेमधून ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होते.  परंतु बहुतांशी साधक शास्त्राचे केवळ श्रवण करतात.

 

साधकाच्या जीवनामध्ये शास्त्रचिंतन अत्यंत आवश्यक आहे.  शास्त्रचिंतनामधुनच जगताचे मिथ्यात्व हळुहळू मनामध्ये रूजायला लागते.  स्वप्नाप्रमाणे जगत् असत्, भासमान दिसते.  एकदा ही जगन्मिथ्यात्वबुद्धि दृढ झाली की, मग ध्यानोत्तर जीवन अतिशय सुलभ होते.  जसे चित्रामधील साप, नाग किंवा वाघ पाहूनही आपल्याला भीति वाटत नाही.  कारण चित्रामधील साप, नाग हे खोटे आहेत, याचे आपणास निश्चित ज्ञान असते.  त्याप्रमाणे जगताला दिलेल्या सत्यतवाचा ज्ञानाने निरास झाला की, संपूर्ण दृश्य विश्व, भोग्य पदार्थ हे चित्रातील पदार्थांच्याप्रमाणे मिथ्या दिसायला लागतात.  त्यामुळे त्या भासमान पदार्थांच्या विषयी मनामध्ये आसक्ति किंवा तिरस्कारही निर्माण होत नाही.  त्यापासून कोणताही अनर्थ किंवा दुःख निर्माण होत नाही.  हीच जीवन्मुक्तावस्था आहे.

 

जसे दोरीमधून भासमान होणाऱ्या सापाच्या भीतीमधून मुक्त व्हावयाचे असेल तर हातात काठी घेऊन सापाला प्रत्यक्ष मारण्याची आवश्यकताच नाही.  किंवा अन्य काहीही करण्याची गरज नाही.  तर हा साप मिथ्या, काल्पनिक आहे, इतकेच ज्ञान पुरेसे आहे.  हे ज्ञान गुरुमुखामधून मिळाले की, क्षणार्धात सर्पभय नष्ट होते.  त्याचप्रमाणे साधकाने आत्मज्ञानाच्या साहाय्याने स्वतःच्या मनाने, मनामध्ये निर्माण केलेल्या सर्व कल्पनांचा निरास केला की, तो आपोआपच या घोर संसारभयापासून मुक्त होतो.  द्वंद्वरहित, शोकमोहरहित, शांत, पूर्ण, तृप्त होतो.  यालाच "सद्योमुक्ति" किंवा "जीवनमुक्तावस्था" म्हटले जाते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Wednesday, December 22, 2021

संन्यासी कसा असतो ? | Ideal Sanyaasi

 



खरे तर संपूर्ण विश्वामध्ये संन्यासी हा सर्वश्रेष्ठ व सर्वपूज्य असतो.  केवळ वस्त्र म्हणजे संन्यास नव्हे.  घरदार सोडणे, भस्म लावणे, जटा वाढविणे, रुद्राक्षमाळा धारण करणे, दुसऱ्याला ब्रह्मज्ञानाचा कोरडा उपदेश देणे म्हणजे संन्यास नव्हे.  किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी, लोकांनी आपणास मोठा साधु म्हणावे, यासाठी शरीराला क्लेश देणे, अघोरी तपश्चर्या करणे, मानसन्मानासाठी किंवा स्वतःभोवती लोक गोळा करण्यासाठी स्वतःजवळ सिद्धि आहेत, असे भासविणे किंवा काही थोड्याफार सिद्धि प्राप्त झाल्या असतील तर प्रतिष्ठेसाठी, पैशासाठी सिद्धींचा दुरुपयोग करून, बुवाबाजी करून सश्रध्द लोकांना फसविणे म्हणजे साधुत्व किंवा संन्यासीपण नव्हे.  आजकाल संन्यासी म्हटले की, त्याच्याकडे सर्व समाज या मिथ्याचारी, वेषधारी साधूंच्यामुळे पूर्वग्रहदूषित दृष्टीनेच पाहतो.

 

परंतु संन्यासी हा जगद्वंद्य, जगत्पूज्य महात्मा असतो.  अग्नीप्रमाणे तेजस्वी असतो.  सूर्याप्रमाणे ज्ञानी व सर्वप्रकाशक असतो.  चंद्राप्रमाणे अत्यंत शीतल, प्रसन्न व आल्हाददायक असतो.  त्याच्याजवळ शुकब्रह्मासारखे वैराग्य, वसिष्ठांच्यासमान अगाध ज्ञान असते.  तोच संपूर्ण जगताला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतो.  अनादि काळापासून आपल्या पवित्र भारतभूमीमध्ये संन्याशांची ही दिव्य व उज्ज्वल परंपरा चालत आलेली आहे.  आदि शंकराचार्यांनी यांची विभागणी करून चोख व्यवस्था लावून दिली आहे.  इतकेच नव्हे तर आचार्यांनी संन्यासधर्मही सांगून ठेवले आहेत.  त्यांचे पालन करणाराच संन्यासी ठरतो.

 

संपूर्ण शास्त्रामध्ये दांभिक लोकांचा निषेध केला आहे.  भगवान सुद्धा गीतेमध्ये संन्यासी या शब्दाची व्याख्या करतात –

अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः |

स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ||          (गीता अ. ६-१)

जो कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्यकर्म करतो, तोच संन्यासी व तोच योगी आहे.  केवळ अग्नीला स्पर्श न करणारा व निष्क्रिय राहणारा मनुष्य म्हणजे संन्यासी नव्हे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, December 14, 2021

कार्यकारणाच्या अतीत | Beyond Cause & Effect

 



जे लोक विश्व पाहतात, कार्याला सत्यत्व देतात, तेच लोक कारणाला सत्यत्व देतात.  कार्य आहे म्हणून कारण आहे.  विश्व आहे हे गृहीत धरले म्हणून विश्वाचे कारण ब्रह्म आहे, असे श्रुति प्रतिपादन करते.  विश्वाच्या, नामरूपांच्या, विकारांच्या तुलनेने निर्गुण, परब्रह्मावर हा आरोप केलेला आहे, अध्यास केलेला आहे.  प्रत्यक्ष निर्गुण, निर्विशेष परब्रह्मामध्ये कोणत्याही कारणाने विश्वकर्तृत्व संभवत नाही.  अजूनपर्यंत निर्गुण परब्रह्मामधून कोणतेही कार्य निर्माण झालेले नाही.  अजूनपर्यंत विश्वाची निर्मितीच झालेली नाही.  माया आणि निर्गुण निर्विशेष परब्रह्म यांचा काडीमात्र संबंध नाही.  माया परब्रह्मामध्ये कोणत्याही संबंधाने येऊ शकत नाही.  म्हणून परब्रह्म आणि विश्व यांचा संबंधच नाही.  कार्यकारणसंबंधअभावात् |

 

श्रेष्ठ अक्षरापासून सुद्धा हा पुरुष श्रेष्ठ आहे.  प्रथम सांगतात – अक्षरस्वरूप श्रेष्ठ आहे.  कार्याच्या दृष्टीने कारण श्रेष्ठ आहे.  पण त्या कारणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारा पुरुष कार्य आणि कारणाच्याही अतीत आहे.  तो कार्य आणि कारणाचे सुद्धा अधिष्ठान आहे.

 

आज आपण कार्यामधून – कार्याच्या दृष्टीने पाहतो.  निर्गुण परब्रह्मस्वरूपाने मी पाहत नाही.  माझा शोध कार्याकडून कारणाकडे आहे.  व्यष्टीमधून मी समष्टि पाहतो.  कार्यामधून मी चैतन्य पाहतो आणि त्याच्यामुळे त्या चैतन्यामध्ये कार्याच्या अनुषंगाने मी गुणधर्म आरोपित करतो.  याठिकाणी सांगतात की, ते कारणब्रह्म निरतिशय स्वरूपाचे, absolute नाही.  तर ते सापेक्ष ब्रह्म म्हणजेच सोपाधिक ब्रह्म, म्हणजे अध्यस्त ब्रह्म आहे. अत्यंत सोप्या भाषेत श्रीसमर्थ सांगतात –

जयासी लटिका आळ आला |  जो माया गौरी पासून जाला |

जाला चि नाही तया अरूपाला |  रूप कैचे ||                  (आत्माराम)

 

म्हणून त्या ब्रह्माचे विश्वकर्तृत्व, सर्वज्ञत्वादि असणारे सर्व गुण, इतकेच नव्हे तर ईशनशीलत्व हा सर्व अध्यास आहे.  नव्हे-नव्हे, श्रुतीनेच मागील मंत्रामध्ये जे सांगितले – अक्षरात् द्विविधा सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापीयन्ति |  विश्व निर्माण होते आणि लय पावते हा सर्व अध्यास आहे.  येथे श्रुतीला कारणब्रह्म सांगावयाचे नाही आणि कार्यब्रह्म सुद्धा सांगण्याची इच्छा नाही.  तर श्रुतीला निराकार, निर्गुण, निर्विशेष स्वरूप सांगण्याची इच्छा आहे आणि ते सांगण्यासाठी श्रुति अध्यारोप-अपवाद या न्यायाने सांगते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, December 7, 2021

हनुमंता – तू कोण आहेस ? | Hanuman – Who are you ?

 



मी मनबुद्धिचित्तअहंकार यांनी बनलेले अंतःकरणचतुष्टय नाही.  तसेच, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेन्द्रिये, पंचमहाभूत नाही, तर मी शिवस्वरूप असून सच्चिदानंद, साक्षी, चैतन्यस्वरूप आहे.  याविषयी रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आहे.  राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू रामचंद्र एक दिवस अत्यंत सहजपणे वानराची चेष्टा करावी म्हणून हनुमंताला प्रश्न विचारतात की, “हे वानरा !  तू माझ्याकडे कोणत्या दृष्टीने, कोणत्या भावाने पाहतोस ?  तू माझ्यावर कोणत्या नात्याने प्रेम करतोस ?”  यावर क्षणाचाही विलंब न लावता भक्त हनुमान प्रभु श्रीरामचंद्राला उत्तर देतो –

देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः |

आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता मतिः ||          (अध्यात्मरामायण)

 

“हे प्रभू रामा !  मी तुझ्याकडे शरीराच्या दृष्टीने पाहिले तर तू माझा अखंड स्वामी राहशील आणि मी तुझा एक यःकश्चित् दास म्हणूनच तुझ्या चरणांशी राहीन.  जीवबुद्धीने मी तुझा एक छोटासा अंश आहे आणि तू महान आहेस.  तू सागर आहेस आणि मी तुझा एक थेंब, अंश आहे.  तुझ्यापुढे माझी शक्ति क्षुल्लक, अत्यंत लहान आहे.  परंतु, स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिल्यास तू आणि मी भिन्न नाही.  तू आणि मी एकच आहोत.  ही माझी निश्चित मति, ज्ञान आहे.”  उपाधीमध्ये भेद असतील, परंतु तात्त्विक, पारमार्थिक स्वरूपाने मी आणि ते चैतन्यस्वरूप एक आहे.

 

त्याचप्रमाणे अग्नि आणि ठिणगी हे तत्त्वतः एक, अद्वयस्वरूप आहेत.  ठिणग्यांचे उत्पत्तिस्थितिलयकारण अग्नि आहे.  त्या अग्नीमधून निर्माण होतात, अग्निमध्येच अस्तित्वात असतात आणि अग्नीमध्येच लय पावतात.  तसेच, हे सर्व जीव चैतन्यामधूनच निर्माण झाले, चैतन्यामध्येच अस्तित्वात आहेत आणि चैतन्यामध्येच लय पावतात.  म्हणून श्रुति म्हणते –

आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् |  आनन्दाद्ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते |

आनन्देन जातानि जीवन्ति |  आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्तीति ||               (तैत्ति. उप. ३-६)

आपण सर्वजण आनंदामधूनच निर्माण झालो, आनंदामध्येच जगतो आणि आनंदामध्येच लय पावणार आहोत.  असे ते परब्रह्म या संपूर्ण विश्वाचे कारण आहे.

 


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ