Sunday, December 26, 2021

चिंतनाचे महत्त्व | Importance of Mental Reflection

 



सर्व साधक वर्षानुवर्षे शास्त्राचे श्रवण करतात.  तरीही ही जीवनमुक्तावस्था सर्वांना का बरे प्राप्त होत नाही ?  यावर विचार केला तर समजते की साधकाने शास्त्रश्रवण केले तरी त्यावर पाहिजे तसे चिंतन होत नाही.  श्रवणानंतर मनन व निदिध्यासना या साधना क्रमाने सांगितलेल्या आहेत.  श्रवणामधून शास्त्राचे ज्ञान होते.  मननामधून शास्त्रामधील शंका निरसन होतात आणि चिंतन किंवा निदिध्यासनेमधून ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होते.  परंतु बहुतांशी साधक शास्त्राचे केवळ श्रवण करतात.

 

साधकाच्या जीवनामध्ये शास्त्रचिंतन अत्यंत आवश्यक आहे.  शास्त्रचिंतनामधुनच जगताचे मिथ्यात्व हळुहळू मनामध्ये रूजायला लागते.  स्वप्नाप्रमाणे जगत् असत्, भासमान दिसते.  एकदा ही जगन्मिथ्यात्वबुद्धि दृढ झाली की, मग ध्यानोत्तर जीवन अतिशय सुलभ होते.  जसे चित्रामधील साप, नाग किंवा वाघ पाहूनही आपल्याला भीति वाटत नाही.  कारण चित्रामधील साप, नाग हे खोटे आहेत, याचे आपणास निश्चित ज्ञान असते.  त्याप्रमाणे जगताला दिलेल्या सत्यतवाचा ज्ञानाने निरास झाला की, संपूर्ण दृश्य विश्व, भोग्य पदार्थ हे चित्रातील पदार्थांच्याप्रमाणे मिथ्या दिसायला लागतात.  त्यामुळे त्या भासमान पदार्थांच्या विषयी मनामध्ये आसक्ति किंवा तिरस्कारही निर्माण होत नाही.  त्यापासून कोणताही अनर्थ किंवा दुःख निर्माण होत नाही.  हीच जीवन्मुक्तावस्था आहे.

 

जसे दोरीमधून भासमान होणाऱ्या सापाच्या भीतीमधून मुक्त व्हावयाचे असेल तर हातात काठी घेऊन सापाला प्रत्यक्ष मारण्याची आवश्यकताच नाही.  किंवा अन्य काहीही करण्याची गरज नाही.  तर हा साप मिथ्या, काल्पनिक आहे, इतकेच ज्ञान पुरेसे आहे.  हे ज्ञान गुरुमुखामधून मिळाले की, क्षणार्धात सर्पभय नष्ट होते.  त्याचप्रमाणे साधकाने आत्मज्ञानाच्या साहाय्याने स्वतःच्या मनाने, मनामध्ये निर्माण केलेल्या सर्व कल्पनांचा निरास केला की, तो आपोआपच या घोर संसारभयापासून मुक्त होतो.  द्वंद्वरहित, शोकमोहरहित, शांत, पूर्ण, तृप्त होतो.  यालाच "सद्योमुक्ति" किंवा "जीवनमुक्तावस्था" म्हटले जाते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ