खरे तर संपूर्ण विश्वामध्ये संन्यासी हा
सर्वश्रेष्ठ व सर्वपूज्य असतो. केवळ
वस्त्र म्हणजे संन्यास नव्हे. घरदार
सोडणे, भस्म लावणे, जटा वाढविणे, रुद्राक्षमाळा धारण करणे, दुसऱ्याला
ब्रह्मज्ञानाचा कोरडा उपदेश देणे म्हणजे संन्यास नव्हे. किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी, लोकांनी
आपणास मोठा साधु म्हणावे, यासाठी शरीराला क्लेश देणे, अघोरी तपश्चर्या करणे, मानसन्मानासाठी
किंवा स्वतःभोवती लोक गोळा करण्यासाठी स्वतःजवळ सिद्धि आहेत, असे भासविणे किंवा
काही थोड्याफार सिद्धि प्राप्त झाल्या असतील तर प्रतिष्ठेसाठी, पैशासाठी सिद्धींचा
दुरुपयोग करून, बुवाबाजी करून सश्रध्द लोकांना फसविणे म्हणजे साधुत्व किंवा
संन्यासीपण नव्हे. आजकाल संन्यासी
म्हटले की, त्याच्याकडे सर्व समाज या मिथ्याचारी, वेषधारी साधूंच्यामुळे पूर्वग्रहदूषित
दृष्टीनेच पाहतो.
परंतु संन्यासी हा जगद्वंद्य, जगत्पूज्य महात्मा असतो. अग्नीप्रमाणे तेजस्वी असतो. सूर्याप्रमाणे ज्ञानी व सर्वप्रकाशक असतो. चंद्राप्रमाणे अत्यंत शीतल, प्रसन्न व
आल्हाददायक असतो. त्याच्याजवळ
शुकब्रह्मासारखे वैराग्य, वसिष्ठांच्यासमान अगाध ज्ञान असते. तोच संपूर्ण जगताला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक
असतो. अनादि काळापासून आपल्या पवित्र
भारतभूमीमध्ये संन्याशांची ही दिव्य व उज्ज्वल परंपरा चालत आलेली आहे. आदि शंकराचार्यांनी यांची विभागणी करून चोख
व्यवस्था लावून दिली आहे. इतकेच नव्हे
तर आचार्यांनी संन्यासधर्मही सांगून ठेवले आहेत. त्यांचे पालन करणाराच संन्यासी ठरतो.
संपूर्ण शास्त्रामध्ये दांभिक लोकांचा निषेध
केला आहे. भगवान सुद्धा गीतेमध्ये संन्यासी
या शब्दाची व्याख्या करतात –
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः |
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः
|| (गीता अ. ६-१)
जो कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्यकर्म
करतो, तोच संन्यासी व तोच योगी आहे. केवळ
अग्नीला स्पर्श न करणारा व निष्क्रिय राहणारा मनुष्य म्हणजे संन्यासी नव्हे.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- हरी ॐ–