मी मनबुद्धिचित्तअहंकार यांनी बनलेले
अंतःकरणचतुष्टय नाही. तसेच, पंचज्ञानेंद्रिये,
पंचकर्मेन्द्रिये, पंचमहाभूत नाही, तर मी शिवस्वरूप असून सच्चिदानंद, साक्षी,
चैतन्यस्वरूप आहे. याविषयी रामायणामध्ये
एक सुंदर प्रसंग आहे. राज्याभिषेक
झाल्यानंतर प्रभू रामचंद्र एक दिवस अत्यंत सहजपणे वानराची चेष्टा करावी म्हणून
हनुमंताला प्रश्न विचारतात की, “हे वानरा ! तू माझ्याकडे कोणत्या दृष्टीने, कोणत्या भावाने
पाहतोस ? तू माझ्यावर कोणत्या नात्याने
प्रेम करतोस ?” यावर क्षणाचाही विलंब न
लावता भक्त हनुमान प्रभु श्रीरामचंद्राला उत्तर देतो –
देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या
त्वदंशकः |
आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता
मतिः || (अध्यात्मरामायण)
“हे प्रभू रामा ! मी तुझ्याकडे शरीराच्या दृष्टीने पाहिले तर
तू माझा अखंड स्वामी राहशील आणि मी तुझा एक यःकश्चित् दास म्हणूनच तुझ्या चरणांशी
राहीन. जीवबुद्धीने मी तुझा एक छोटासा अंश
आहे आणि तू महान आहेस. तू सागर आहेस
आणि मी तुझा एक थेंब, अंश आहे. तुझ्यापुढे
माझी शक्ति क्षुल्लक, अत्यंत लहान आहे. परंतु,
स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिल्यास तू आणि मी भिन्न नाही. तू आणि मी एकच आहोत. ही माझी निश्चित मति, ज्ञान आहे.” उपाधीमध्ये भेद असतील, परंतु तात्त्विक, पारमार्थिक
स्वरूपाने मी आणि ते चैतन्यस्वरूप एक आहे.
त्याचप्रमाणे अग्नि आणि ठिणगी हे तत्त्वतः
एक, अद्वयस्वरूप आहेत. ठिणग्यांचे
उत्पत्तिस्थितिलयकारण अग्नि आहे. त्या
अग्नीमधून निर्माण होतात, अग्निमध्येच अस्तित्वात असतात आणि अग्नीमध्येच लय
पावतात. तसेच, हे सर्व जीव चैतन्यामधूनच
निर्माण झाले, चैतन्यामध्येच अस्तित्वात आहेत आणि चैतन्यामध्येच लय पावतात. म्हणून श्रुति म्हणते –
आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् | आनन्दाद्ध्येव
खल्विमानि भूतानि जायन्ते |
आनन्देन जातानि जीवन्ति | आनन्दं
प्रयन्त्यभिसंविशन्तीति || (तैत्ति.
उप. ३-६)
आपण सर्वजण आनंदामधूनच निर्माण झालो, आनंदामध्येच जगतो आणि आनंदामध्येच लय पावणार आहोत. असे ते परब्रह्म या संपूर्ण विश्वाचे कारण आहे.
- "मुण्डकोपनिषत् " या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati,
1st Edition, March 2007
- हरी ॐ–