Tuesday, December 14, 2021

कार्यकारणाच्या अतीत | Beyond Cause & Effect

 



जे लोक विश्व पाहतात, कार्याला सत्यत्व देतात, तेच लोक कारणाला सत्यत्व देतात.  कार्य आहे म्हणून कारण आहे.  विश्व आहे हे गृहीत धरले म्हणून विश्वाचे कारण ब्रह्म आहे, असे श्रुति प्रतिपादन करते.  विश्वाच्या, नामरूपांच्या, विकारांच्या तुलनेने निर्गुण, परब्रह्मावर हा आरोप केलेला आहे, अध्यास केलेला आहे.  प्रत्यक्ष निर्गुण, निर्विशेष परब्रह्मामध्ये कोणत्याही कारणाने विश्वकर्तृत्व संभवत नाही.  अजूनपर्यंत निर्गुण परब्रह्मामधून कोणतेही कार्य निर्माण झालेले नाही.  अजूनपर्यंत विश्वाची निर्मितीच झालेली नाही.  माया आणि निर्गुण निर्विशेष परब्रह्म यांचा काडीमात्र संबंध नाही.  माया परब्रह्मामध्ये कोणत्याही संबंधाने येऊ शकत नाही.  म्हणून परब्रह्म आणि विश्व यांचा संबंधच नाही.  कार्यकारणसंबंधअभावात् |

 

श्रेष्ठ अक्षरापासून सुद्धा हा पुरुष श्रेष्ठ आहे.  प्रथम सांगतात – अक्षरस्वरूप श्रेष्ठ आहे.  कार्याच्या दृष्टीने कारण श्रेष्ठ आहे.  पण त्या कारणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारा पुरुष कार्य आणि कारणाच्याही अतीत आहे.  तो कार्य आणि कारणाचे सुद्धा अधिष्ठान आहे.

 

आज आपण कार्यामधून – कार्याच्या दृष्टीने पाहतो.  निर्गुण परब्रह्मस्वरूपाने मी पाहत नाही.  माझा शोध कार्याकडून कारणाकडे आहे.  व्यष्टीमधून मी समष्टि पाहतो.  कार्यामधून मी चैतन्य पाहतो आणि त्याच्यामुळे त्या चैतन्यामध्ये कार्याच्या अनुषंगाने मी गुणधर्म आरोपित करतो.  याठिकाणी सांगतात की, ते कारणब्रह्म निरतिशय स्वरूपाचे, absolute नाही.  तर ते सापेक्ष ब्रह्म म्हणजेच सोपाधिक ब्रह्म, म्हणजे अध्यस्त ब्रह्म आहे. अत्यंत सोप्या भाषेत श्रीसमर्थ सांगतात –

जयासी लटिका आळ आला |  जो माया गौरी पासून जाला |

जाला चि नाही तया अरूपाला |  रूप कैचे ||                  (आत्माराम)

 

म्हणून त्या ब्रह्माचे विश्वकर्तृत्व, सर्वज्ञत्वादि असणारे सर्व गुण, इतकेच नव्हे तर ईशनशीलत्व हा सर्व अध्यास आहे.  नव्हे-नव्हे, श्रुतीनेच मागील मंत्रामध्ये जे सांगितले – अक्षरात् द्विविधा सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापीयन्ति |  विश्व निर्माण होते आणि लय पावते हा सर्व अध्यास आहे.  येथे श्रुतीला कारणब्रह्म सांगावयाचे नाही आणि कार्यब्रह्म सुद्धा सांगण्याची इच्छा नाही.  तर श्रुतीला निराकार, निर्गुण, निर्विशेष स्वरूप सांगण्याची इच्छा आहे आणि ते सांगण्यासाठी श्रुति अध्यारोप-अपवाद या न्यायाने सांगते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ