Tuesday, October 26, 2021

रजोगुणाचे दोन प्रकार | Two Types of Modes of Passion

 रजोगुण सतत कर्मामध्येच प्रवृत्त करीत असल्यामुळे तेच कर्म निष्काम वृत्तीने केले तर रजोगुणाच्या रागद्वेषांचा परिणाम कमी होतो.  म्हणून प्रत्येक कर्म ईश्वरार्पणबुद्धीने निष्काम वृत्तीने परमेश्वराची सेवा म्हणून करावे.  याचा अर्थ कर्माचा त्याग करून अंतःकरणशुद्धि होत नाही किंवा मनाची बहिर्मुख प्रवृत्ति कमी होत नाही.  शारीरिक कर्म केले नाही तर रजोगुणामधून निर्माण होणारे विकल्प, मनाच्या प्रतिक्रिया, द्वंद्व, विक्षेप कमी होत नाहीत. म्हणून साधकाने प्रथम निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने रजोगुणाची प्रवृत्ति कमी करावी.  याप्रमाणे अखंड, दीर्घकाळ केलेल्या सेवेने रजोगुण शांत होतो.

 

रजोगुण दोन प्रकारचा आहे.  १) शुद्ध रजोगुण व २) अशुद्ध रजोगुण.  अशुद्ध रजोगुण अज्ञानी, मूढ मनुष्यामध्ये असून त्यामुळे मनामध्ये सतत कामक्रोधादि विकारांचा उत्कर्ष होतो.  प्रत्येक कर्माच्या मागे कर्मफळाची अपेक्षा राहाते.  आपल्याला किती मिळावे, काय मिळावे, काय मिळू नये, तसेच केव्हा मिळावे याचा निर्णय आपणच ठरवितो.  त्यामुळे सतत अपेक्षाभंगाचे दुःख, उद्विग्नता, नैराश्य त्याच्या वाट्याला येते.  थोडक्यात अशुद्ध रजोगुण शेवटी मनुष्याच्या दुःखालाच कारण होतो.

 

याउलट साधु पुरुषांमध्ये शुद्ध रजोगुण असतो.  त्याच्या मनामधील उपभोग घेण्याची वासना कमी झालेली असल्यामुळे मनामध्ये रागद्वेषांचा प्रभाव कमी होतो.  कोणतेही कर्म द्वंद्वरहित, उत्स्फूर्त असून अपेक्षारहित, निष्काम वृत्तीने सेवाभावाने होत असल्यामुळे यश मिळाले तरी साधुपुरुष हुरळून जात नाही किंवा अपयशाने, अपेक्षाभंगामुळे दुःखी, उद्विग्न होत नाही.  कितीही प्रतिबंध आले तरी तो आपले काम सतत करीत राहातो.  तो स्वकर्तव्यापासून कधीही च्युत होत नाही.  उलट या शुद्ध रजोगुणामुळेच समाजामध्ये महान कार्य घडत असते.  म्हणून प्रत्येक साधकाने आपल्यामध्ये असलेला अशुद्ध रजोगुण शुद्ध करण्याचा अभ्यास करावा.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ