आचार्य सांगतात -
विवाहो न विलासार्थः प्रजार्थः एव केवलः |
तेजो बुद्धिः बलध्वंसो विलासात् प्रभवेत् खलु ||
अत एव परित्यज्य विलासं मोहकारणम् |
संनियम्येन्द्रियग्रामं विचारेण सुखी भवेत् ||
विवाह हा केवळ शारीरिक स्वैर, उच्छृंखल उपभोगासाठी
नसून फक्त प्रजोत्पत्तीसाठी आहे. परंतु इंद्रियांच्यावर
संयमन न ठेवता, कामनेने प्रेरित होऊन मनुष्य त्या उपभोगामध्ये रममाण झाला तर
त्याचे तेज, बुद्धि व बल यांचा ध्वंस होतो. त्याच्या ज्ञानाचा नाश होतो. सर्व दैवीगुण, सद्गुण नष्ट होतात. तो पशूपेक्षाही अधम वृत्तीने स्वैराचारामध्ये
प्रवृत्त होऊन स्वतःचा नाश करवून घेतो. म्हणून
शास्त्रकार सर्व जीवांना आदेश देतात की, रतिसुख हेच मोहाचे कारण असल्यामुळे त्याचा
त्याग करून आत्मसंतुष्टता प्राप्त करून घ्यावी, कारण हे सर्व उपभोग दु:खालाच कारण
आहेत.
म्हणून भगवान सर्व साधकांना कळवळून सांगतात
की, या धर्मविरुद्ध असणाऱ्या राजसिक व तामसिक कामाचा त्याग करावा. इंद्रियांच्यावर संयमन करावे. आपल्या नित्यनैमित्तिक, वेदविहित कर्मांचे
सातत्याने दीर्घकाळ अनुष्ठान करावे. धर्मानुष्ठान,
सदाचार, ईश्वरपूजन, सेवा, त्याग यामध्येच जीवन व्यतीत करावे. आपला आहार-विहार, कर्म सात्त्विक करावे. उपभोगही सात्त्विक घ्यावेत. त्यामुळे आपोआपच मनावरही नियमन होऊन मन अत्यंत
शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, क्षोभरहित, विक्षेपरहित, द्वंद्वरहित, भोगवासनारहित होईल.
असे मनच निरतिशय आनंद म्हणजेच
मोक्षप्राप्तीसाठी साहाय्यकारी साधन होईल.
म्हणजेच धर्माला अनुकूल असणारा जो काम
आहे तोच इंद्रियांच्यावर संयमन, दमन करणारा आहे. तोच शमदमादिषट्कसंपत्तीचे साधन होऊन सद्गुणांची जोपासना करतो. तोच काम मनुष्याला धर्मामिमुख करून विवेकवैराग्यादिगुण
देतो. तोच काम
मनुष्याला शेवटी आत्मसुख, आत्मशांति देऊन मनुष्याचे जीवन पूर्ण, तृप्त, संतुष्ट
करतो. मनुष्यांच्यामध्ये असणारा हा
धर्मयुक्त ‘काम’ हे माझे परमात्म्याचेच स्वरूप आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–