आपण
सर्वजण प्रतिमेमधून चैतन्याची उपासना करतो.
आपण सर्वजण चैतन्याचेच उपासक आहोत.
चैतन्य हे तर निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक, निराकार आहे आणि माझे मन
विषयासक्त, बहिर्मुख आहे. असे मन विषयवृत्तीरहित
करून चैतन्यस्वरूपापर्यंत नेण्यासाठी सगुण, साकार, सविशेष रूप मला साधन होते. सगुण उपासनेच्या साहाय्याने मी माझे मन
अत्यंत सहजपणाने विषयांपासून निवृत्त करू शकतो. हा पहिला भाग.
दुसरे म्हणजे हे सगुण, साकार रूप परमेश्वराचे प्रतिक असल्यामुळे माझे मनही
शुद्ध, सत्वगुणप्रधान होते.
विश्वामधील
विषयही दृश्य, सगुण, साकार आहेत आणि परमेश्वराच्या विग्रहाचे रूपही सगुण, साकार
आहे. आजपर्यंत आपल्या मनाला अहोरात्र दृश्य
विषय बघण्याचीच सवय लागलेली आहे. डोळ्यांना
दृश्य विषय दिसल्यानंतरच मी मनाने त्या विषयाचे चिंतन करतो. त्याचप्रमाणे ईश्वराचे चिंतन करावयाचे असेल तर
प्रथम सगुण, साकार, सविशेष रूपाची अत्यंत आवश्यकता आहे. परमेश्वराचे सगुणरूप हे मनाला आलंबन होते. सगुण उपासना परमेश्वरस्वरूपापर्यंत नेण्यासाठी
साधकाला साहाय्यकारी साधन होते. म्हणून
उपासना हे साध्य नसून उपासना हे साधन आहे.
ज्याप्रमाणे
उंच उडीच्या खेळामध्ये एक आडवा बांबू बांधला जातो. मला स्वतःला एकदम एवढी उंच उडी मारता येत नाही. त्यासाठी मी हातात एक बांबू आधार, साधन म्हणून
घेतो. त्याच्या साहाय्याने एकदम उडी घेऊन
आडव्या बारपर्यंत जातो. तेथपर्यंत हातात
बांबू असतो. बारच्या पलीकडे जाताना तो
आधार म्हणून घेतलेला बांबू सोडून देतो. अगदी
याचप्रमाणे मला निर्गुण, निर्विशेष, निरूपाधिक चैतन्यस्वरूपाची प्राप्ति करावयाची
असेल तर त्यासाठी सगुण उपासना हे साधन होते. सगुणोपासना हे फक्त मनासाठी आलंबन साधन आहे
की ज्यामुळे बहिर्मुख, विषयासक्त असणारे मन अंतर्मुख बनू शकेल.
- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, July 2011
- Reference: "Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, July 2011
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment