Tuesday, February 25, 2020

जागृतावस्थेचे शास्त्र | Science of Awakeness





चैतन्याचे किरण म्हणजेच जीव किंवा चिदाभास होत.  ज्याप्रमाणे, एकाच सूर्याची अनेक बादल्यांच्यामधील पाण्यामध्ये अनेक प्रतिबिंबे निर्माण होतात.  ही प्रतिबिंबे म्हणजे केवळ सूर्याचा भास आहे.  त्याचप्रमाणे, सर्व जीव म्हणजे चैतन्याचे भास, चिदाभास आहेत.  किरणांचा विस्तार म्हणजे चिदाभासांचा विस्तार झालेला आहे.  म्हणजेच चिदाभासांनी सर्व उपाधींना, सर्व शरीरांना व्याप्त केले आहे.  यानंतर त्या चिदाभासांनी स्थिर असणाऱ्या वृक्षादि पदार्थांना व चर असणाऱ्या मनुष्यादि प्राणिमात्रांना, म्हणजेच सर्व जड विषय आणि सर्व मनुष्य-पशू-पक्षी या सर्वांच्या समूहाला व्याप्त केले आहे.  

चिदाभास या सर्वांना वृत्तिरूपाने व्याप्त करतात.  चिदाभास म्हणजेच मनाचे स्पंदन किंवा मनाचे स्फुरण होय.  चिदाभास या मनाच्या वृत्तीच्या साहाय्याने त्या त्या शरीरापर्यंत किंवा विषयापर्यंत जाऊन त्या त्या विषयाशी व शरीराशी तादात्म्य पावतो.  त्या त्या शरीराचे रूप धारण करतो.  तसेच दृश्य विषयांपर्यंत जाऊन त्या-त्या विषयाची विशिष्ठ तदाकार, विषयाकार वृत्ति निर्माण होते.  जितके विषय तितक्या वृत्ति निर्माण होतात.  याप्रमाणे, चिदाभास स्वतः एका शरीराशी तादात्म्य पावून, ती उपाधि धारण करून नंतर घट-पट-वृक्ष-डोंगर-सूर्य-चंद्र-नदी-हत्ती वगैरेदि अशा असंख्य, अगणित विषयांना, पदार्थांच्या समूहाला व्याप्त करतो.  

याप्रमाणे चिदाभासाने शरीर व विषयांना व्याप्त केल्यानंतर चिदाभासाचा शरीर व इंद्रिये यांचा बाह्य दृश्य विषयांशी संबंध येतो.  इंद्रिये व विषय यांचा संनिकर्ष झाला की, त्यामधून सुख-दुःखादि अनुभव निर्माण होतात.  चिदाभासाला हे सर्व सुखदुःखादि संमिश्र अनुभव अनुभवायला येतात.  थोडक्यात, ज्यावेळी चिदाभास स्थूल शरीराशी तादात्म्य पावून इंद्रियांच्या माध्यमामधून स्थूल विषयांचा अनुभव घेतो, त्यास ‘जागृतावस्था’ असे म्हणतात.  या अवस्थेमध्ये मन बाह्य विषयांना जागृत असते.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ

No comments:

Post a Comment