Tuesday, February 4, 2020

नाण्याची दुसरी बाजू | Other Side of the Coin
काम एष क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिहवैरिणम् ||              (गीता अ. ३-३७)   

“हे अर्जुना ! महाखादाड असणारा काम व महापापी असणारा क्रोध हे रजोगुणामधून निर्माण झालेले असून तेच मनुष्याचे खरे शत्रू आहेत.” कामनाच मनुष्याला सतत अतृप्त व अशांत ठेवून अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त करते. कामनापूर्तीमध्ये एखादा प्रतिबंध आला तर त्याच कामनेचे रूपांतर क्रोधामध्ये होऊन मनुष्याचे मन क्रोधाविष्ट, संतप्त व उद्विग्न होते. याप्रकारे रागद्वेष, कामक्रोधादि विकार यामुळे मनुष्याचे जीवन उध्वस्त व अधःपतित होते. यासाठीच मनुष्याने विचार करणे आवश्यक आहे. ज्या विषयांमुळे मनामध्ये कामना व अन्य सर्व विकार निर्माण होतात, त्या विषयाचे खरे, वास्तविक स्वरूप काय आहे, याचा निरपेक्ष विचार करावा.

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात म्हणतो की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला दिसताना एकच बाजू दिसते. दुसरी बाजू नेहमीच अदृश्य असते. त्याचप्रमाणे खरे तर सर्व दृश्य विषयांना दोन बाजू आहेत. परंतु व्यवहारामध्ये आपण विषयांची सतत व सहजपणे डोळ्यांना समोर दिसणारी एकच बाजू पाहतो व ती बाजू म्हणजेच विषयांचे सौंदर्य, आकर्षण व मोहकात्व ! बाह्य सौंदर्यालाच आपण भुलतो व सुखासाठी विषयांच्या मागे धावतो.

परंतु, विवेकी पुरुषाने विवेकाच्या साहाय्याने विषयांची बाजू म्हणजेच विषयांचे दोष, मर्यादा जाणणे आवश्यक आहे. विषयांच्यामध्ये प्रामुख्याने – अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व व मिथ्यात्व असे चार प्रकारचे दोष आहेत. हे दोष जाणणे यालाच ‘विषयदोषदर्शन’ असे म्हणतात. शास्त्रामध्ये विषयदोषदर्शन हा शाब्दिक अभ्यास नसून एक फार मोठी अंतरिक साधना आहे. साधकाने याचा सखोल विचार करावा. विषयदोषदर्शन हा आचार्यांच्या ‘भज गोविन्दम् | या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. कारण विषयांच्यामधील दोष समजले तर मनुष्य आपोआपच त्यामधून निवृत्त होऊ शकतो.  - "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015- हरी ॐ


No comments:

Post a Comment