Saturday, July 27, 2019

“ॐ नमः शिवाय” – ३ | Meaning of “Om Namah Shivay” – 3





‘नमः’ या शब्दाची शक्ति ‘नमन’ या अर्थामध्ये आहे.  ‘नमन’ याचा अर्थच अत्यंत नम्र, विनयशील असणारा भाव होय.  म्हणून नम्रता, विनयशीलता हाच ‘नमः’ या शब्दाचा एक अर्थ आहे.  साधकाला जर आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करवून त्या ज्ञानाची अनुभूति घ्यायची असेल तर नम्रता हा एक अत्यंत आवश्यक असणारा गुण आहे.  इतकेच नव्हे, तर नम्रता हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे.  

सुभाषितकार म्हणतात – विद्या विनयेन शोभते |  ज्याठिकाणी ज्ञान, विद्वत्ता आहे, त्याच ठिकाणी मनुष्य नम्र, विनयशील होतो.  नम्रता हे ज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे.  नम्रतेशिवाय कधीही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.  म्हणूनच ‘नमः’ या शब्दामधून आचार्य या श्लोकामध्ये नम्रता हा गुण सूचित करतात, कारण नम्रतेमध्येच, विनयशीलतेमध्येच साधकामधील अहंकाराचा नाश होतो, अभिमानाचा ध्वंस होतो.  ज्याठिकाणी अहंकार, ममकारादि प्रत्यय समर्पित होते, त्याचठिकाणी साधकाच्या मनामध्ये ईश्वराबद्दल, गुरूंच्याबद्दल, शास्त्राबद्दल दृढ असणारी श्रद्धा, उत्कट भाव निर्माण होतो.  

आचार्य ‘नमः’ याचा आणखीन एक अर्थ सांगतात – नमनं ध्यानमेव च |  नमन म्हणजेच ‘ध्यान’ होय.  ध्यान याचा अर्थच निदिध्यासना होय.  ध्यान या शब्दाची व्याख्या केली जाते – ध्यायते अनेन इति ध्यानम् |  

ज्या क्रियेच्या साहाय्याने एखाद्या विशिष्ट वस्तूचे चिंतन केले जाते, त्यास ‘ध्यान’ असे म्हणतात.  ध्यानप्रक्रियेच्या साहाय्याने मन आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिर आणि एकाग्र होते.  नमन यामध्ये दोन शब्द आहेत – ‘न’ + ‘मन’.  ज्याठिकाणी आपले मनच उरत नाही, तेच खरे नमन किंवा ध्यान होय.  ध्यानाच्या साहाय्याने हळुहळू आपले मन म्हणजेच मनामधील सर्व वृत्ति, सर्व विकार, विक्षेप, द्वंद्व, विकल्प विरून जातात.  मनाचे अस्तित्वच राहत नाही.  तेथे नीरव शांतीची, निरतिशय आनंदाची अनुभूति येते.   



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ



Tuesday, July 23, 2019

“ॐ नमः शिवाय” – २ | Meaning of “Om Namah Shivay” – 2




नमः शिवाय |”  यामधील ‘अय’ या प्रत्ययाचा अर्थ स्पष्ट करतात.  ‘अय’ म्हणजेच ‘गमय’ – तू मला घेऊन जा, कारण मी नित्य शुद्ध आहे.  याचे कारण आचार्य दुसऱ्या ओळीमध्ये देतात – देह, गेह वगैरेदि या सर्व अनात्म विषयांच्या मध्ये असणाऱ्या अभिमानाचा नाश करणाऱ्या तुला मी प्रणाम करतो.  मी तुला शरण आलेलो आहे.  म्हणूनच मी निश्चितपणे शुद्ध आहे.  म्हणूनच तू मला घेऊन चल.  

अय इति गमय इति अर्थे – याठिकाणी ‘शिवाय’ या पदामधील ‘अय’ हा चतुर्थीचा प्रत्यय असून तो गमय (घेऊन चल) याअर्थी वापरलेला आहे.  कोठे घेऊन चल ?  तर तुझ्या शिवस्वरूपामध्ये मला घेऊन जा.  अशी याठिकाणी उपासक शिवाला प्रार्थना करतो.  

प्रत्येक जीवामध्ये देह व देहाच्या अनुषंगाने अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे पाच कोश, आकाश, वायु, अग्नि, आप, पृथ्वी ही पंचमहाभूते, सात उर्ध्वलोक व सात अधोलोक मिळून चौदा भुवने याप्रकारे संपूर्ण व्यष्टि आणि समष्टि विश्वाबद्दल अभिमान निर्माण होतो.  इदं अहं अस्मि इति देहाभिमानः |  हा देह म्हणजेच मी आहे, हा देहाभिमान होय.  इदं मम अस्ति, इदं मे स्यात् |  “हे माझे आहे, हे माझे व्हावे” याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक भोग्य गेहादि विषयांबद्दल असणारा अभिमान म्हणजेच बाह्य अभिमान होय.

या दोन्हीही अभिमानांचा नाश म्हणजेच निवृत्ति म्हणजेच प्रणाम होय.  जो साधकामधील हे दोन्हीही अभिमान नाहीसे करतो, त्याला ‘प्रणाम’ असे म्हणतात.  म्हणून प्रणाम म्हणजे केवळ शरीराने खाली वाकणे नव्हे.  प्रणाम ही शारीरिक क्रिया नसून प्रणाम हे अभिमान नाश करण्याचे प्रभावी साधन आहे.  कारण प्रणाम म्हणजेच आत्मसमर्पण होय.  वर उदधृत केलेल्या दोन्हीही अभिमानांचा त्याग झाल्याशिवाय आत्मसमर्पण होऊ शकत नाही.  

म्हणून याठिकाणी शिवभक्त शिवाला निवेदन करीत आहे की, “हे भगवंता !  मी तुला शरण आलो आहे.  माझा सर्व अहंकार, अभिमान तुझ्या चरणी समर्पित केला आहे.  त्यामुळे मी शुद्ध झालो आहे.” 


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, July 16, 2019

दैन्यावस्थेचे महात्म्य | Importance of Humility




संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज लिहितात –
      संतत्व नाही कवित्वात संतत्व नाही मठात |  
      संतत्व नाही विद्वत्तेत तेथे स्वानुभव पाहिजे ||  
याप्रमाणे साधकाच्या अंतःकरणामध्ये तीव्र व्याकुळता हवी.  ही व्याकुळता प्राप्त करण्यासाठी मी भगवंताला, शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  काया-वाचा-मनसा त्याची सेवा करतो.  या सर्व सेवेचे फळ म्हणजेच दैन्यावस्थेची प्राप्ति !  म्हणूनच येथे म्हटले आहे – प्रणामो दैन्यलब्धये |  

भगवान नारदमहर्षि सुद्धा आपल्या गुरूंना व्याकूळ होऊन प्रार्थना करतात – “हे गुरो !  मी आज चौदा विद्या, चौसष्ठ कला यांमध्ये पारंगत आहे.  तरीही मी अत्यंत शोकाकुल आहे.  अगतिक होऊन तुला शरण आलेलो आहे.  तूच मला या शोकसागराच्या पार करून ने.”  या अवस्थेलाच व्याकुळता म्हणतात.  त्यावेळी साधकाचे मन फक्त परमशांतीसाठीच चातकाप्रमाणे आतुर होते.  अशी उत्कट भावावस्था प्राप्त करण्यासाठीच मी – नमः शिवाय |  ईश्वराला, शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  त्यासाठीच सेवा करतो.  

जसे, घराला चारही बाजूंनी आग लागली, आगीचा लोळ आपल्यापर्यंत आला, आपला कपडा पेटला, तर त्यावेळी आपण आपल्या सल्लागारांना सल्ले विचारात बसत नाही.  अन्य जीवनभर संग्रह केलेल्या वस्तु सांभाळत बसत नाही.  एकेका क्षणाने मृत्यु आपल्यावर झेपावत असतो.  हे जेव्हा दिसते, त्याचवेळी जीवनाची किंमत कळते.  सहज जगत असतो, तोपर्यंत जीवनाची किंमत कळत नाही.  आग लागल्यावर सर्व शक्तीने, व्याकुळतेने, तीव्र गतीने आपण पाण्याकडे धाव घेतो.  भगवंताच्या प्राप्तीसाठी अशीच व्याकुळता निर्माण झाली पाहिजे.  त्यासाठीच नमः शिवाय |  म्हणजे मी शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  

किंवा दैन्यं याचा दुसरा अर्थ होतो – ज्ञाप्तिः |  जो साधक निष्काम झालेला असून त्याच्या मनामध्ये प्रखर वैराग्य निर्माण झालेले आहे, तो सुद्धा नमः शिवाय |  - ज्ञाप्तिसिद्धये |  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी नमस्कार करतो.  ज्ञानप्राप्ति हेच साधकाचे अंतिम साध्य आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, July 9, 2019

त्याग आणि चतुर्विध पुरुषार्थ | Sacrifice and 4 Life-Goals




धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ आणि काम हे ऐहिक पुरुषार्थ आहेत.  व्यवहारामध्ये धन, संपत्ति वगैरे कोणतीही कामना पूर्ण करण्यासाठी तीन घटकांची आवश्यकता असते. प्रयत्नं, कालं, दैवम्.  प्रयत्न म्हणजेच कोणतीही इच्छा पूर्ण करावयाची असेल तर केवळ मनोरथ रचून इच्छा पूर्ण होत नाही.  त्यासाठी पुरुषप्रयत्न म्हणजेच योग्य कर्म करावे लागते.  दुसरा घटक आहे – काळ!  साध्यप्राप्तीपर्यंत सातत्याने काही काळ न थकता, न थांबता कर्म केले पाहिजे.  

मात्र ‘दैव’ हा तिसरा घटक मनुष्याधीन नसून उलट मनुष्यच दैवाधीन असतो.  दैव म्हणजेच परमेश्वराची अज्ञात शक्ति होय.  तोच घटक संपूर्ण विश्वावर, सर्व जीवांच्यावर नियमन करीत असतो.  म्हणून तोच ईशनशील ईश्वर असून कर्तुं-अकर्तुम् आहे.  जीव हा नियम्य असून ईश्वर हा नियामक आहे.  म्हणूनच कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण कार्यसिद्धीसाठी परमेश्वराचे आवाहन करतो.  ‘दैव’ हा तिसरा घटक अनुकूल असेल तरच कार्यसिद्धी होते.  अर्थ आणि कामाच्या प्राप्तीसाठी सुद्धा ईश्वराचे आवाहन आवश्यक आहे.  परमेश्वराचे आशीर्वाद-अनुग्रह-कृपा आवश्यक आहे.  म्हणून अर्थ व कामासाठी मी – ‘नमः’ म्हणजेच इदं त्यजामि |  मी ईश्वराला पत्र-पुष्पादि अर्पण करीत आहे.  

तिसरा ‘धर्म’ हा पारलौकिक पुरुषार्थ आहे. पारलौकिक स्वर्गप्राप्ति व स्वर्गभोग मिळावेत, यासाठी मी – नमः – इदं सर्वं त्यजामि | मी पत्र-पुष्पादि अर्पण करतो. स्वर्गादि प्राप्तीसाठी वेदांच्यामध्ये अनेक प्रकारचे यज्ञयागादि कर्म सांगितले जातात. यज्ञामध्येही हवन केले जाते. म्हणजेच तेथेही अर्पण केले जाते. त्याग केले जाते.

चवथा पुरुषार्थ म्हणजेच परमपुरुषार्थ ‘मोक्ष’ होय.  त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी मी सर्व त्याग करतो.  मोक्ष म्हणजेचअत्यंत दुःखनिवृत्तिः निरतिशय आनंदस्य प्राप्तिः |  सर्व प्रकारच्या दुःखांचा निरास आणि निरतिशय आनंदाची, सुखाची प्राप्ति होय.  निरतिशय आनंद हेच परमात्म्याचे स्वरूप आहे.  ते स्वरूप प्राप्त करण्यासाठीच म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी – अहं इदं इदं त्यजामि |  मी या सर्वांचा त्याग करतो.  याचे कारण परमात्मस्वरूप प्राप्त करावयाचे असेल तर परमात्माव्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचा त्याग केला पाहिजे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, July 2, 2019

“ नमः ” म्हणजे त्याग | “Namah” Means Sacrifice




‘नमः’ याचा कर्मकांडामध्ये ‘त्याग’ असा अर्थ आहे.  यज्ञामध्ये यजमान मंत्रांच्या साहाय्याने यज्ञकुंडामध्ये हवन करीत असतो – इन्द्राय स्वाहा इदं न मम |  अग्नेय स्वाहा इदं न मम |   ज्यावेळी मी एखादी गोष्ट त्याग करतो, अर्पण करतो, त्यावेळी त्या वस्तुवरील माझा मालकी हक्क संपतो.  त्याग म्हणजेच ममत्वाचा त्याग होय.  त्याग म्हणजे समर्पण होय.  त्याग म्हणजे देवून टाकणे नव्हे.  ‘त्याग’ ही शारीरिक क्रिया नसून अंतःकरणाचा एक उदात्त भाव आहे.  

एखादी वस्तु मला निरुपयोगी असेल किंवा आपल्या घरात अडगळ झालेली असेल, म्हणून ती दुसऱ्याला देवून टाकावी, या वृत्तीने दिले असेल तर त्यास ‘त्याग’ म्हणता येत नाही.  अन्यथा दुसऱ्याने मला मोठे म्हणावे, समाजामध्ये मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने किंवा निवडणुका जवळ आल्यानंतर मतांसाठी जर काही दिले तर त्याला ‘त्याग’ असे म्हणता येत नाही.  याचे कारण त्याग करीत असताना खरे तर वस्तु, पैसा यांचा त्याग नसून या सर्वांच्याविषयी आपल्या मनामध्ये जो ममत्वाचा भाव असतो, त्याचा त्याग आहे.  

सर्वात शेवटी “मी त्याग केला” या अहंकारवृत्तीचा त्याग होणे, हा खरा त्याग आहे.  त्यागाच्या वृत्तीमागे शुद्ध आनंद असतो.  त्याग करून आनंद मिळत नसेल, उलट मनामध्ये रुखरुख वाटत असेल, एखादी वस्तु दिली म्हणून पश्चाताप होत असेल तर तो ‘त्याग’ नव्हे.  

याठिकाणी साधक ‘नमः शिवाय’ यामधून शिवाला सर्व समर्पण करीत आहे.  म्हणजेच त्याग करण्यास योग्य असणारे पत्र, फळ, फूल वगैरे अर्पित आहे.  त्याचे फळ म्हणजेच साधकाला आनंदाची प्राप्ति होते.  



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ