धर्म-अर्थ-काम-मोक्ष
या चार पुरुषार्थांपैकी अर्थ आणि काम हे ऐहिक पुरुषार्थ आहेत. व्यवहारामध्ये धन, संपत्ति वगैरे कोणतीही
कामना पूर्ण करण्यासाठी तीन घटकांची आवश्यकता असते. प्रयत्नं, कालं, दैवम्. प्रयत्न
म्हणजेच कोणतीही इच्छा पूर्ण करावयाची असेल तर केवळ मनोरथ रचून इच्छा पूर्ण होत
नाही. त्यासाठी पुरुषप्रयत्न म्हणजेच
योग्य कर्म करावे लागते. दुसरा घटक आहे –
काळ! साध्यप्राप्तीपर्यंत सातत्याने काही
काळ न थकता, न थांबता कर्म केले पाहिजे.
मात्र
‘दैव’ हा तिसरा घटक मनुष्याधीन नसून उलट मनुष्यच दैवाधीन असतो. दैव म्हणजेच परमेश्वराची अज्ञात शक्ति होय. तोच घटक संपूर्ण विश्वावर, सर्व जीवांच्यावर
नियमन करीत असतो. म्हणून तोच ईशनशील
ईश्वर असून कर्तुं-अकर्तुम् आहे. जीव हा
नियम्य असून ईश्वर हा नियामक आहे. म्हणूनच
कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण कार्यसिद्धीसाठी परमेश्वराचे आवाहन करतो. ‘दैव’ हा तिसरा घटक अनुकूल असेल तरच कार्यसिद्धी
होते. अर्थ आणि कामाच्या प्राप्तीसाठी
सुद्धा ईश्वराचे आवाहन आवश्यक आहे. परमेश्वराचे
आशीर्वाद-अनुग्रह-कृपा आवश्यक आहे. म्हणून
अर्थ व कामासाठी मी – ‘नमः’ म्हणजेच इदं त्यजामि | मी ईश्वराला पत्र-पुष्पादि अर्पण करीत आहे.
तिसरा
‘धर्म’ हा पारलौकिक पुरुषार्थ आहे. पारलौकिक स्वर्गप्राप्ति व स्वर्गभोग मिळावेत,
यासाठी मी – नमः – इदं सर्वं त्यजामि | मी पत्र-पुष्पादि अर्पण करतो. स्वर्गादि
प्राप्तीसाठी वेदांच्यामध्ये अनेक प्रकारचे यज्ञयागादि कर्म सांगितले जातात.
यज्ञामध्येही हवन केले जाते. म्हणजेच तेथेही अर्पण केले जाते. त्याग केले जाते.
चवथा
पुरुषार्थ म्हणजेच परमपुरुषार्थ ‘मोक्ष’ होय. त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी मी सर्व त्याग
करतो. मोक्ष म्हणजेच – अत्यंत
दुःखनिवृत्तिः निरतिशय आनंदस्य प्राप्तिः | सर्व प्रकारच्या दुःखांचा निरास आणि निरतिशय
आनंदाची, सुखाची प्राप्ति होय. निरतिशय
आनंद हेच परमात्म्याचे स्वरूप आहे. ते
स्वरूप प्राप्त करण्यासाठीच म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी – अहं इदं इदं त्यजामि |
मी या सर्वांचा त्याग करतो. याचे कारण परमात्मस्वरूप प्राप्त करावयाचे
असेल तर परमात्माव्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचा त्याग केला पाहिजे.
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment