मनुष्य,
विशेषतः विज्ञानयुगातील मानव विश्वामधील सर्व बाह्य गोष्टींचा विचार करण्यातच
आयुष्य घालवितो. परंतु त्याला स्वतःच्याच
जीवनाचे महत्व समजत नाही. सर्व
वेद-उपनिषदे-गीता-पुराणे या सर्व ग्रंथांच्यामधून मनुष्यशरीराचे माहात्म्य वर्णन
केलेले आहे.
मनुष्ययोनी
ही कर्मभूमी असून अन्य सर्व भोगभूमी आहेत. एखाद्या मनुष्याने खूप पुण्यसंचय करून
देवलोकाची प्राप्ति केली तरीही तेथे पुरुषार्थ नाही. जोपर्यंत पुण्यसंचय आहे, तोपर्यंत तेथील दिव्य
भोग तो जीव भोगतो व पुण्यक्षयानंतर पुन्हा खाली येतो. भोगत असताना त्याला स्वतंत्र पुरुषार्थ नाही. तसेच मनुष्ययोनीपेक्षा निकृष्ठ योनीमधील जीव
सुद्धा आपल्या नीच कर्मांनी अधोयोनीस प्राप्त होऊन तेथील निकृष्ठ फळे भोगतात. तेथे त्यांना स्वतःचा पुरुषार्थ करता येत नाही.
मनुष्ययोनीमध्ये
मनुष्य जरी आपल्या कर्मांची फळे प्रारब्धाच्या रूपाने भोगत असेल तरी दुसऱ्या
बाजूला त्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. पुरुषार्थ व कर्तृत्व करण्याचे स्वातंत्र्य आहे. याचे कारण मनुष्याला जन्मतःच इच्छाशक्ति,
क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति अशा तीन दुर्मिळ शक्ति दिलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर या तीनही शक्तींचा सदुपयोग
करण्यासाठी सदसद्विवेकबुद्धि दिलेली आहे. चांगले-वाईट, धर्म-अधर्म, नीति-अनीति, पाप-पुण्य
हे सर्व ठरविण्याची शक्ति दिलेली आहे.
मनुष्याला
धर्म-अर्थ-काम-मोक्ष असे चार पुरुषार्थ दिलेले आहेत. त्यापैकी अर्थ व काम ही सहजस्वाभाविक प्रवृत्ति
आहे. पैसा, ऐश्वर्य मिळविणे, अनेक
कामना निर्माण करणे, प्रजोत्पत्ति करणे किंवा अन्न-वस्त्र-निवारा मिळविणे या सर्व
सहज प्रवृत्ति आपल्याला पशूंच्यामध्येही दिसतात. परंतु मनुष्याला मात्र धर्म व मोक्ष हे दोन
जास्तीचे पुरुषार्थ दिलेले आहेत. प्रत्येक
मनुष्याने अधर्माचा त्याग करून धर्मपरायण जीवन जगावे. सदाचार, सत्कर्म, आचारधर्म यांचे अनुष्ठान
करावे. इतकेच नव्हे, तर मनुष्यजीवनाचा
अंतिम पुरुषार्थ म्हणजे मोक्षप्राप्ति आहे.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment