विश्वामध्ये
सकाम लोकांच्या व्यतिरिक्त असणारे काही निष्काम साधक आहेत. ज्यांच्या अंतःकरणामधून सर्व ऐहिक व पारलौकिक
भोगांच्या इच्छा गळून पडलेल्या आहेत, त्यांना निष्काम साधक असे म्हणतात. निष्काम साधक सर्व श्रौत-स्मार्त, वेदविहित,
नित्य-नैमित्तिक कर्म तसेच अनेक प्रकारच्या देवता-उपासना सुद्धा करतात. त्यामागे त्यांची कोणतीही कामना नसते. तो साधक विवेकाने, सदसद्विवेकबुद्धीच्या
साहाय्याने विषयांच्या, भोगांच्या मर्यादा जाणतो. त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते.
खरोखरच
हे विश्व काय आहे ? विश्वाचे, विषयांचे
स्वरूप काय आहे ? सर्व दृश्य विषय
काळाच्या ओघात नाश पावतात, हे तो पाहतो. रोजच्या
दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो. याप्रमाणे विचार
करीत गेले तर त्याला समजते की, सर्वच दृश्य प्रपंच नाशवान आहे. मग त्याला प्रश्न पडतो की, सत्य काय आहे ? तो सत्याचा शोधक होतो.
बाह्य
विश्वाप्रमाणेच तो स्वतःच्या जीवनाचाही विचार करू लागतो. मी कोण ? मी जन्माला का आलो ? माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे ? माझ्या जीवनाचे साध्य काय ? केवळ पैसा मिळविणे, मोठमोठ्या इमारती बांधणे,
जगात नाव-प्रसिद्धि कमविणे, शाब्दिक ज्ञानाच्या पदव्या मिळविणे, प्रजोत्पादन करणे,
प्रजेचे संगोपन करणे, येथेच्छ उपभोग घेणे हेच साध्य आहे की, यापेक्षा काही वेगळे
साध्य आहे ?
विचार
करता-करता त्याला उत्तरही सापडते. मनुष्याला
फक्त सुख, शांति हवी आहे. निरतिशय
आनंदाची प्राप्ति करणे व सर्व दुःखांचा निरास करणे, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य
आहे. याची त्याला अंतरंगामधून तीव्र जाणीव
होते. तेव्हाच तो ‘साधक’ या संज्ञेस पात्र
होतो.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment