Tuesday, April 9, 2019

नैसर्गिक मृत्यूचे वर्णन | Natural Death Process

मृत्यूच्या समयी मनामध्ये जो संकल्प असेल त्या संकल्पाने युक्त होऊन जीव इंद्रियांच्या सर्व शक्ति हळुहळू खेचून घेतो.  त्या सर्व शक्ति एकत्रित होऊन नंतर मुख्य प्राणात लीन होतात.  येथे आचार्य नैसर्गिक मृत्यूची स्थिति सांगतात.  जीव तेव्हा मुख्य प्राणवृत्तीनेच जिवंत राहतो.  त्यावेळी इंद्रियांच्या शक्ति मुख्य प्राणामध्ये लीन झाल्यामुळे इंद्रियांचे व्यापार शांत होतात.  त्यावेळी त्या व्यक्तीस डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही.  शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध या कशाचेही ज्ञान होत नाही.  गाढ सुषुप्तीप्रमाणे त्याची स्थिति असते.  इंद्रियांचे व्यापार व मनाच्याही सर्व वृत्ति क्रमाने लय पावतात.  फक्त प्राणवृत्ति राहते.

गाढ सुषुप्तीची अवस्था व मृत्यूच्या समयीची अवस्था अगदी समान आहे.  फक्त यामध्ये एकच फरक आहे – तो म्हणजे सुषुप्तिअवस्थेमध्ये शरीर गार पडत नाही.  शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखले जाते, कारण तेथे उदान वायू आहे.  मात्र मृत्युसमयी शरीर गार पडते, कारण त्यावेळी फक्त मुख्य प्राणवृत्तीच असते.  म्हणून त्यावेळी आपले सगेसोयरे नातेवाईक आपापसात बोलतात की, याचा श्वासोच्छवास जोरात चालू आहे, परंतु शरीर मात्र गार पडले आहे.  

याप्रमाणे मुख्य प्राणामध्ये सर्व शक्ति एकत्रित झाल्यामुळे तो प्राण तेजाने म्हणजेच उदानवायूने युक्त होतो.  शरीरामधील उदानवायू फक्त मृत्युसमयीच कार्यरत होतो.  मृत्युसमयी मुख्य प्राण उदानवायूसह शरीराचा अधिपति असणाऱ्या जीवात्म्याशी संयुक्त होतो.  जो जीव कर्मफळांचा भोक्ता आहे, अशा जीवाला त्याच्या कर्मानुसार तसेच मृत्युसमयीच्या संकल्पानुसार त्या त्या लोकाला घेऊन जातो.  अशा प्रकारे शरीराचा नैसर्गिक मृत्यु होतो.  

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः |
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ||        (गीता अ. १५ - ८) 
भगवान वर्णन करतात – वायु जसा गंधाच्या स्थानापासून गंधाचे ग्रहण करून घेऊन जातो, त्याचप्रमाणे जीवात्मा सुद्धा ज्या शरीराला सोडून जातो त्यातून मनासह इंद्रियांना घेऊन पुन्हा तो नवीन शरीर प्राप्त होते त्यामध्ये जाऊन तादात्म्य होतो.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012

- हरी ॐ

No comments:

Post a Comment