Tuesday, May 7, 2019

गुरूंची आवश्यकता काय ? | Necessity of Guru




कोणी म्हणेल की, ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गुरुंच्याकडे कशाला जायला पाहिजे ?  आम्ही आमच्या बुद्धीने, तर्काने, युक्तीच्या साहाय्याने हे ज्ञान घेऊ.  परंतु हे ज्ञान तर्काने घेणेही शक्य नाही.  श्रुति म्हणते – “नैषा तर्केण मतिरापनेया” इति श्रुतेश्च |  आत्मज्ञान केवळ तर्काने, स्वबुद्धिसामर्थ्याने प्राप्त होत नाही.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंची नितांत आवश्यकता आहे.

ज्या साधकाला गुरूंची प्राप्ति झालेली आहे, तोच निश्चितपणे आत्मस्वरूपाला यथार्थपणे जाणतो, कारण आत्मवस्तु ही अतिशय सूक्ष्म असून इंद्रियअगोचर आहे.  तसेच आत्मवस्तु ही विश्वामधील घटपटादि विषयांच्याप्रमाणे एखादी निर्मित दृश्य वस्तु नाही.  म्हणून आत्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही.  अन्य इंद्रियांचाही आत्मा हा विषय नाही.  म्हणून आत्म्याला कानाने ऐकता येत नाही.  स्पर्श करता येत नाही.  इतकेच नव्हे, तर मनानेही आत्म्याची अनुभूति येत नाही.  आत्मा स्थूल बुद्धीने जाणता येत नाही, कारण आत्मा हा इंद्रियांचा, मनबुद्धीचा विषय होत नाही.

म्हणूनच आचार्य आदेश देतात -
पण्डितेनापि स्वातन्त्र्येण ब्रह्मन्वेषणं न कुर्यात् |     (शांकरभाष्य)

पंडित, विद्वान पुरुषाने देखील स्वतंत्रपणे, स्वतःच्या बुद्धीने ब्रह्मविचार करू नये.  त्यासाठी श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच अनन्य भावाने शरण जावे.  यासाठीच आत्मजिज्ञासु साधक, मुमुक्षु प्रत्यगात्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचा नि:शेष त्याग करतो.  हा साधक ऐहिक व पारलौकिक भोगांच्या आसक्तीपासून पूर्णतः विरक्त होतो आणि तो फक्त एका अभय, नित्य, शिव, अचल स्वरूपाची इच्छा करून गुरूंना शरण जातो.


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ

No comments:

Post a Comment