Tuesday, March 13, 2018

कर्माची खरी कुशलता | The Real Skill in Work




मोक्षाच्या प्राप्तीसाठी क्रमाने पाहिले तर सर्वप्रथम निष्कामकर्मयोग हेच साधन आहे.  मग येथे शंका येईल की, कर्म हेच मोक्षाचे साधन असेल तर सर्वच माणसे रात्रंदिवस कर्मरत आहेत.  त्यामुळे सर्वच जण मुक्त झाले पाहिजेत.  परंतु असे होत नाही.  तर उलट कर्म करून मनुष्य बद्ध होतो.  म्हणूनच भगवान सांगतात की, कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात.

योगः कर्मसु कौशलम्  |   (गीता अ. २-५०)
केवळ नाकतोंड दाबणे, दोन वेळेला प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे, तर कर्मामधील कुशलता म्हणजेच योग आहे आणि ही कुशलता म्हणजेच कर्मामधील निष्काम सेवावृत्ति होय.  अशा प्रकारे कर्म करूनच क्रमाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते.  

जसे, व्यवहारामध्ये आपण पाहतो की, काट्यानेच काटा काढावा.  काटा पायात गेला की खूप यातना होतात.  त्यामुळे त्याठिकाणी कितीही चिंध्या बांधल्या, मलमपट्टी केली तरी सुद्धा जोपर्यंत काटा आत आहे, तोपर्यंत यातना या होणारच !  या यातनांच्यामधून कायमचे मुक्त व्हावयाचे असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे दुसरा टोकदार काटा घ्यावा आणि त्याच्या साहाय्याने पहिला काटा काढावा आणि नंतर दोन्हीही काटे फेकून द्यावेत.  

तसेच निष्काम कर्माच्या साहाय्याने कर्मबंधनाचा नाश केला पाहिजे.  दुष्कर्मांचा त्याग करावा आणि सत्कर्म करीत असताना सुद्धा त्या कर्मामागील कामनांचा, वासनांचा त्याग करावा.  म्हणजेच कर्मामागील दृष्टि बदलावी.  कर्मे तीच करावयाची आहेत.  जर तीच कर्मे सकाम केली, कामना ठेवून केली तर जीवाला ती बद्ध करतात.  जसे, ज्योतिष्टोमेन यजेत् स्वर्गकामः |  स्वर्गकामनेने प्रेरित होऊन जर अग्निहोत्रादि कर्म केले तर मनुष्याला स्वर्गप्राप्ति होते, परंतु – क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति |  या न्यायाने तो मनुष्य पुन्हा मर्त्यलोकात येऊन कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकतो.  परंतु तेच कर्म निष्काम भावनेने केले, आसक्तीचा त्याग केला तर अंतःकरणशुद्धीसाठी ते साधन होते आणि क्रमाने मनुष्य कर्म-कर्मफळाच्या जंजाळामधून मुक्त होतो.  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
                              

- हरी ॐ




No comments:

Post a Comment