वेद
आज्ञा देतात –
सत्यं
वद | धर्मं चर | मातृदेवो भव |
पितृदेवो
भव | आचार्यदेवो भव | (तैत्ति. उप. १-११)
धर्मनिष्ठ
जीवन जगणारा पुरुषच आत्मनिष्ठा प्राप्त करू शकतो. म्हणून पूर्वीच्या काळी आई-वडील पुढच्या पिढीला,
आपल्या मुलांना नियमावली देत. आजकालची
मुले ते सर्व नियम खुंटीला अडकवून ठेवतात. “यात काय आणि त्यात काय?” अशा वृत्तीने वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करतात. हेच चित्र आपण समाजात पाहत आहोत. जी जी नीतिमूल्ये या पिढीने झुगारून दिली,
त्या सर्वांचे भयंकर परिणाम म्हणजेच विस्कळीत कुटुंबसंस्था, मोठ्यांच्या विषयी
अनादर, जीवनामध्ये जाणवणारी पोकळी, नैराश्य, वैफल्य, द्वंद्व, वाढणाऱ्या
आत्महत्या, वाढणारे वृद्धाश्रम, स्वैर भोगवाद, घटस्फोटांचे वाढते प्रमाण,
आधुनिकतेच्या नावावर आपल्या हिंदु संस्कृतीच्या परंपरांना दिलेली तिलांजली हे सर्व
आजची पिढी भोगत आहे.
म्हणून
दोष आपल्या आई-वडिलांचा, परंपरेचा किंवा धर्माचा नाही तर आपल्या स्वतःमध्येच दोष
आहे. ज्या क्षणी आपल्या जीवनामधील
धर्माचे उच्चाटन होते, त्याचक्षणी आपल्या अधःपतनास प्रारंभ होतो. यासाठीच श्रुति कर्माचे म्हणजेच धर्माचे विधान
देते. कार्मानुष्ठानामुळे अंतःकरण
शुद्ध होऊन विवेकवैराग्यादि दैवीगुणांनी मन संपन्न होईल आणि तेच मन शास्त्राच्या
श्रवणासाठी अधिकारी होईल. हा श्रुतीचा कर्मानुष्ठान
सांगण्यामागे अभिप्राय आहे.
इतकेच
नव्हे, तर श्रुति यापुढे जाऊन सांगते – अन्यथा इतः नास्ति | याशिवाय दुसरा मार्गच नाही. शुभ म्हणजेच चांगली कर्मे केल्यामुळे मनुष्य
आपोआपच अशुभ कर्मांपासून, अधर्मापासून परावृत्त होतो आणि सत्कर्मांच्या
अनुष्ठानामुळे त्याचे मन क्रमाक्रमाने शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, रागद्वेषरहित,
अंतर्मुख होते. अशा कर्माने मनुष्य
लिप्त, बद्ध होत नाही, तर तेच कर्म त्याला मुक्तीचे साधन होते.
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- Reference: "Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment