Tuesday, June 6, 2017

ज्ञान पापांच्यामधून मुक्त करते | Knowledge Liberates from Sins


अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः |
सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रुजिनं संतरिष्यसि ||   (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-३६)
हे अर्जुना !  जरी तू सर्व पापी लोकांच्यापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ पापी असशील तरीही ज्ञानरूपी नौकेने तू निःसंदेहपणे सर्व पापांच्यामधून तरून जाशील.  

येथे ज्ञानाने मनुष्य सर्व पापांच्यामधून मुक्त होतो, असे सांगितले आहे.  याचा अर्थ – तो लगेच मुक्त होईल, असे नाही.  तर त्यासाठी मनुष्याला ज्ञाननौकेमध्ये बसण्यासाठी प्रथम नौकेच्या जवळ गेले पाहिजे.  त्यासाठी नौकेचा शोध घेतला पाहिजे.  तसेच, नौकेमध्ये बसण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे.  आणि नौका चालविण्यासाठी कुशल नावाड्याची – गुरूंची जरुरी असून त्यांच्यावर नितांत श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे.  

श्रद्धा-भक्तीने, विश्वासाने आपल्या जीवनाची सूत्रे गुरूंच्या हातात दिली पाहिजेत, कारण ते स्वतःच संसाररूपी महासागराला पार करून परतीला पोहोचलेले अत्यंत अनुभवी, कुशल आहेत.  स्वतः तरति परान् अपि तारयति |  या न्यायाने अन्य संसारी जीवांना या महासागरामधून पार करून नेण्यासाठी तेच अत्यंत निपुण नावाडी आहेत.  म्हणून प्रत्येक साधकाने या विश्वामध्ये संसार पार करण्यासाठी गुरूंना नितांत श्रद्धा आणि अनन्य भावाने शरण जावे.  म्हणजे ते श्रेष्ठ आचार्य साधकाचा उद्धार करतील.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड ते तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे हो तु ||   (पसायदान)
जे लांछनरहित पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अंतरंगामधून सर्व दोषरहित, शुद्ध, परिपूर्ण आत्मस्वरूप प्राप्त केलेले आहेत आणि तापरहित असलेल्या तेजस्वी, प्रकाशस्वरूप सूर्याप्रमाणे आहेत ते श्रेष्ठ, ज्ञानी पुरुष सर्व जीवांचे कल्याण करणारे असल्यामुळे साधकांनी त्यांच्याशी सोयरिक करावी.  म्हणजेच त्यांना श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने शरण जावे.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment