Tuesday, April 25, 2017

रामायण – जीवनामधील युद्ध | Ramayana – War in Our Life


श्रीराम आणि रावण यांच्यामधील युध्द हे केवळ दोन व्यक्तींच्यामधील युद्ध नाही.  तर श्रीराम आणि रावण म्हणजेच दैवीगुणसंपत्ति आणि आसुरीगुणसंपत्ति या दोन भिन्न-भिन्न प्रवृत्ति आहेत.  म्हणूनच श्रीराम आणि रावण यांचे युद्ध म्हणजे या विश्वामध्ये असणारा धर्म आणि अधर्म यांच्यामधील युद्ध होय.  

त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपल्याच अंतरंगामध्ये आपण जर पाहिले, तर युद्ध हे बाहेर नाही, तर ते आपल्याच आत आहे.  आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सात्विकप्रवृत्ति म्हणजेच दैवीगुणसंपत्ति आणि सतत क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येणारे विकार, आसुरीगुणसंपत्ति यांच्यामध्ये सतत युद्ध, संघर्ष चालू आहे.  जीवनभर रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला हा अंतरिक संघर्ष प्रत्येक मनुष्य अनुभवतो.  

युद्धामध्ये धर्माच्या - श्रीरामाच्या पक्षामध्ये वानरे आहेत आणि रावणाच्या पक्षामध्ये आसुर आहेत. वानरे म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व सात्विक वृत्ति आहेत.  अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, सहनशीलता, ऋजुता, गुरुसेवा, शुद्धि, स्थिरता, आत्मनिग्रह, स्वाध्याय, विवेक, वैराग्य, शम-दम-उपरति-तितिक्षा-श्रद्धा-समाधान, मुमुक्षुत्व, भक्ति, सेवा, निष्ठा, समर्पण असे हे अनंत दैवी गुण आहेत.  तीच जणु काही श्रीरामाच्या पक्षामधील वानरे आहेत.  या वानरांचा प्रमुख म्हणजेच सर्वश्रेष्ठ भक्त हनुमान आहे.  म्हणून भक्ति हीच सर्व दैवी गुणांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे.  भक्तिमधूनच अन्य सर्व दैवी गुण उदयाला येतात.  जेथे भक्ति आहे, तेथेच सेवा आहे.  त्याठिकाणीच शमदमादि संपत्ति आहे.  तेथेच विवेक-वैराग्य या सर्व दैवी गुणांचा आविष्कार आपल्याला दिसतो.  

अनादि काळापासून हे धर्मयुध्द चालूच आहे.  आस्तिक-नास्तिक, धर्म-अधर्म, नीति-अनीति, सदाचार-दुराचार, न्याय-अन्याय, सत्य-असत्य यांच्यामधील हे युद्ध आहे.  या युद्धाचा निर्णय एकच – आणि तो म्हणजे धर्माचा, नीतीचा, सदाचाराचा, न्यायाचा व सत्याचा विजय होय.  


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007
- हरी ॐ

No comments:

Post a Comment